जळगावात जनता कर्फ्युचा अंमल सुरू

0
31

जळगाव : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या तीन दिवसाच्या जनता कर्फ्युचा अंमल काल रात्री ८ वाजेपासून सुरू झाला. त्यानंतर शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला असून रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसत आहे. या जनता कर्फ्युची कडक अंमलबजावणी होण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची विशेष पथके नियुक्त केल असून शहरात अकारण फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र मुख्य बाजारपेठ सोडून विस्तारीत भागात काही दुकानदार बेजबाबदारपणे व्यवहार सुरू ठेवत असल्याचे वृत्त आहे. अशा व्यावसायिकांविरूध्द त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रारंभीच्या टप्प्यात लॉक डाऊन न करता जिल्हा प्रशासनाने तीन दिवसाचा जनता कर्फ्यु लागू केला आहे. हा कर्फ्यु जनतेच्या भल्यासाठीच असल्यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांनी आज पहिल्या दिवशी त्यास उत्स्फूर्त दिल्याचे चित्र दिसून आले.
मुख्य चौकात नाकाबंदी करण्यात आली असून शहरातील विविध भागात पोलिस पेट्रोलिंग करत आहे. दरम्यान, शहरातील दाणा बाजार, फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, म. गांधी मार्केट यासह सर्व व्यापारी संकुले बंद असून घाणेकर चौक ते सुभाष चौक परिसरातील बाजारही पूर्णपणे बंद होता. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. शहरात विनाकारण फिरणार्‍यांना अटकाव केला जात आहे. जनता कर्फ्यु दरम्यान अत्यावश्यक आस्थापने सोडून इतर आस्थापने व दुकान सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यसाठी महापालिकेची सहा पथके तयार करण्यात आली असून ती पथके आज सकाळपासून शहरात कार्यरत झाली आहेत. जनता कर्फ्युला जनतेने साथ देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे व मनपा आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here