जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव शहराची विमानसेवा येत्या २ मार्चपासून नांदेड शहराशी जोडली जाणार आहे.जळगावहून अवघ्या साडेचार तासांत नांदेडला पोहोचता येईल.त्यासोबतच अहमदाबाद-जळगाव या मार्गावरील विमान फेर्या दररोज होणार आहेत. मुंबईसाठी आठवड्यातून चार दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे खंडित केलेली व नंतर अल्प प्रमाणात सुरू झालेल्या विमानसेवेला प्रवाशांचा सातत्याने प्रतिसाद लाभत आहे. येत्या मार्च महिन्यापासूनच्या नव्या वेळापत्रकानुसार हे बदल होणार आहेत.
उडाण योजनेत ट्रू-जेट कंपनीतर्फे अमदाबाद-जळगाव व जळगाव-मुंबई या मार्गावर विमान सेवा देण्यात येते. लॉकडाऊन नंतर सुरुवातीला नियमितपणे असणार्या या सुविधा अमदाबाद-जळगाव या मार्गावर आठवड्यातून दोन वेळा व जळगाव-मुंबई ही केवळ एक वेळा सुरू होती. त्यामुळे अनेक व्यावसायिक व गरजूंची अडचण होत होती.
असा असेल रुट
अमदाबादहून स काळी ९.४५ वाजता विमान जळगावसाठी निघून ११.०५ ला पोहोचले.जळगावातून ११.३०ला मुंबईसाठी उड्डाण भरून तेथे दुपारी १२.४५ वाजता ते लॅण्ड होणार आहे. मुंबईहून दुपारी १.२५ वा. रवाना होऊन दुपारी ३ वाजता नांदेडला उतरेल. या विमानाचा परतीचा प्रवास २५ मिनिटांत सुरू होईल.
नांदेडहून दुपारी ३.२५ वाजता निघून मुंबईला ४.५५ वाजता पोहोचेल.मुंबईहून ५.२५ वाजता उडाण भरून संध्याकाळी ६.४० जळगावात लॅण्ड होईल.जळगाव शहरातून संध्याकाळी ७ वाजून ५ वाजता निघून पुन्हा ८ वाजून २५ अहमदाबादला पोहोचेल.
चार तासांची बचत
जळगावहून रोडमार्गे नांदेडला जाण्यासाठी साडेआठ तर रेल्वेने साडेसहा तास लागतात. विमानसेवा सुरू झाल्यास त्यामुळे जळगावातून नांदेडला अवघ्या साडेचार तासांत पोहोचणे शक्य होणार आहे.
व्यावसायिकांची सोय
जळगाव शहर विमानसेवेने अहमदाबाद व मुंबई या शहरांशी जोडले गेले आहे. मध्यंतरी ट्रू-जेट कंपनीतर्फे जळगाव-मुंबई मार्गाचा विस्तार करून तो कोल्हापूरपर्यंत वाढवला परंतु तो नंतर खंडित झाला. आता नांदेड या शहराची यात वाढ झाल्याने पुन्हा तिसर्या शहराशी एअर कनेक्टिव्हिटी वाढली.