जळगाव प्रतिनिधी : प्रत्येक घरात नळाचे शुध्द पाणी पोहचवण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. याच योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल १७१ गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या असून यासाठी ३३६ कोटी ५३ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या ऐतिहासीक क्षणाची साक्ष म्हणून या सर्व गावांच्या सरपंचांना बोलावून त्यांना प्रशासकीय मान्यतेचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. योजना मंजूर झालेल्या गावांच्या सरपंचांनी अचून नियोजन करून आपल्या गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचे आवाहन करतांना याबाबत पालकमंत्र्यांनी त्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्यात. दरम्यान, एकाच वेळेस एका जिल्ह्यातील १७१ गावांना पाणी पुरवठा योजनांची मंजुरी देण्याची घटना ही राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असून या माध्यमातून जिल्ह्यात खर्या अर्थाने जलक्रांती देखील होणार असल्याची भावना देखील पालकमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.*
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांंच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ८३८ गावांमधील पाणी पुरवठा योजनांसाठी तब्बल ९४७ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून यात जिल्हा परिषदेचे ८१८ तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या २० कामांचा समावेश आहे. यातील पहिल्या टप्प्यात १७१ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना तांत्रीक मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, कोणत्याही योजनेच्या यशस्वीतेसाठी अचूक नियोजनाची गरज असते ही बाब लक्षात घेऊन ना. गुलाबराव पाटील यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर झालेल्या गावातील सरपंचांशी आधी देखील संवाद साधून त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या होत्या. यानंतर जिल्ह्यातील १७१ गावातील सरपंचांच्या जळगावातील अजिंठा विश्रामगृहातील बैठकीत बोलावून ना. गुलाबराव पाटील यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांना योजनेच्या यशस्वी कार्यान्वयनासाठी सल्ले दिले.
या बैठकीला आमदार चिमणराव पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदारच चंद्रकांत पाटील, आमदार लताताई सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे मुख्य अभियंता श्री. निकम, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता भोगवडे, मजिप्राचे व जि प चे सर्व शाखा अभियंता, उपअभियंता आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी पालकमंत्र्यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील १७१ सरपंचांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रशासकीय मान्यतेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून जलजीवन मिशन योजना यशस्वी करण्याचे आवाहन केले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी अतिशय विस्तृत असे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आधीच्या पाणी पुरवठा योजनांमधील त्रुटी लक्षात घेऊन त्यांना काढून जलजीवन मिशन ही योजना सुरू करण्यात आली आहे. २०१४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्यासाठी आणि हर घर नल से जल या घोषवाक्यानुसार जलजीवन मिशन ही योजना केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरित्या सुरू केली असून या खात्याचा मंत्री म्हणून राज्यात याचे यशस्वी कार्यान्वयन सुरू करण्यात आले आहे. यात वाढीव मानकानुसार प्रति माणशी ५५ लिटर पाणी पुरवठ्याचे नियोजन असून यामध्ये गुरांसाठी लागणार्या पाण्याचाही अंतर्भाव करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यात या योजनेला अतिशय गतीमान पध्दतीत कार्यान्वीत करण्याचे नियोजन पाणी पुरवठा खाते आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एकीकडे प्रशासन प्रयत्न करत असतांना योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक गावाच्या सरपंचांनीही काही बाबी लक्षात घेण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
*या सुचनांची करा अंमलबजावणी*
ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी उपस्थित सरपंचांना पाणी पुरवठा योजना यशस्वीपणे तातडीने पूर्ण होण्यासाठी अगदी वास्तवावर आधारित मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा स्त्रोत हा सर्वात महत्वाचा घटक असल्याने स्त्रोत तपासून घेणे गरजेचे आहे. ही योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून आधी लोकवर्गणी जमा करणे देखील खूप महत्वाचे आहे. यासोबत जिल्हा परिषदेला आवश्यक असणारी कागदपत्रे, ठराव, टाकीच्या जागा तसेच विहीर यांच्या जागा तात्काळ हस्तांतरित करणे; बुडीत क्षेत्रांमधील विहीर असल्यास त्यासंबंधी प्रस्तावास आवश्यक असणारी कागदपत्रे उपविभागात सादर करणे देखील गरजेचे आहे. पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर पाणी तपासणी करावी, लोकांमध्ये जनजागृती करावी. तसेच अंगणवाडी आणि शाळांना नळ जोडणीत प्राधान्य द्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या. तर योजनांच्या अंमलबजावणीत काहीही अडचण आल्यास पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधा किंवा माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले.
*गावातील प्रत्येक विकासकाम हे महत्वाचे असले तरी रस्ते, गटारी, पथदिवे आदींपेक्षाही महत्वाची बाब म्हणजे पाणी होय. गावात पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यास संबंधीत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे काम हे इतिहासात कायमस्वरूपी नोंदले जाणार आहे. यामुळे सर्व सरपंचांनी आपल्या सहकार्यांसह ही योजना जागरूक आणि तत्पर राहून पुर्ण करावी असे भावनिक आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.*
दरम्यान, आजवर कोणत्याही योजनेशी संबंधीत सूचना देण्यासाठी मंत्र्यांनी कधीही गावच्या सरपंचांशी संवाद साधला नाही. मात्र ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील १७१ गावांच्या सरपंचांना बोलावून त्यांना सोप्या भाषेत ही योजना समजावून सांगत, याच्या यशस्वीतेसाठीच्या टिप्स देखील दिल्याने गावोगावीचे सरपंच भारावून गेल्याचे दिसून आले. यातील अनेकांनी कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानले.