जळगाव: विशेष प्रतिनिधी
आज कोरोनाने सार्या देशाला विळखा घातला आहे,आपले जळगाव सुद्धा त्यास अपवाद नाही.रुग्णांची संख्या रोजच वाढत चालली असून मृत्यू चे आकडे धडकी भरविणारे आहेत. ज्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली ते तात्काळ डॉक्टर कडे धाव घेतात . सार्यांनाच जीव प्यारा असतांना काही डॉक्टर मंडळी अव्वाच्या सव्वा बिल आकारून त्या रुग्णास जिवंत असतांनाच मरण दाखवीत आहेत. अशा काही डॉक्टर मंडळींना रुग्णांकडून घेतलेले जादा बिल परत करण्याची नामुष्की आली असून काहींची मान्यताच रद्द करण्यात आली आहे .या घटना पाहून येथे सर्व सामान्यांनी डॉक्टरांविरुद्ध संताप व चीड व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्याच्या समावेश सद्य स्थितीत कोरोना बाबत राज्यातील दहा हॉटस्पॉट शहरात झाला आहे .आधी जळगाव ची वाढती रुग्ण संख्या पाहता दहा हॉट स्पॉट शहरात असलेला आपला जिल्हा रुग्णसंख्या कमी झाल्याने त्या दहातून वगळला गेला होता, आता मात्र रुग्णसंख्या रोजच हजाराचा आकडा ओलांडत असल्याने जिल्हा पुन्हा हॉटस्पॉट ठरला आहे .हे चित्र नक्कीच धोकादायक आहे .कोरोनाचा प्रसार व संसर्ग रोखण्यासाठी शासन अनेक निर्बंध लावत असतांना काहीच फरक पडलेला नाही हे वाढती रुग्णसंख्या पाहून म्हणावे लागते .
जळगाव शहरातील सर्व दवाखाने फुल,बेड फुल,ऑक्सिजन ची कमतरता , नवी कोविड केयर सेंटर फुल,डेडिकेटेड सेंटर ओव्हरफलो असे येथील चित्र आहे .बर्याच सामाजीक संस्थानीं समाजाप्रती बांधिलकी म्हणून कोविड सेंटर स्थापन केले आहेत , त्यांचे अभिनंदन करावे लागेल .परंतु शहरातील काही डॉक्टर मंडळी आपला हात सोडायला तयार नसल्याच्या घटना समोर येत असल्याने त्यांच्याबद्दल समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे . आधी पैसे ठेवा मगच ऍडमिट करू व नंतर उपचार करू . अशाप्रकारे अडवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागल्याचे दिसत आहेत .
कोणताही डॉक्टर लाखो – करोडो खर्च करून बलाढय व टोलेजंग इमारती उभारतो, त्यात अत्याधुनिक सोई-सुविधा उपलब्ध केल्या जातात , रुग्ण सेवेसाठी एकाच छत्राखाली अनेक सोई-सुविधा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो .पैसे खर्च केले असल्याने ते वसूल करणे प्रत्येकाचा धर्म असतांना काही डॉक्टरांनी आपल्या सेवा धर्मास काळिमा फासण्याचा प्रकार केल्याच्या घटना जळगावात घडल्या आहेत.डॉक्टरांना लोक देवाची उपमा देतात .कारण ते रुग्णसेवा करतात , प्रसंगी रुग्णास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढतात . ते अभिनंदनीय आणि पूजनीय ठरतात.परंतु फक्त कमाईपाहणार्या डॉक्टरांना काय म्हणावे ?
जळगाव शहरात अलीकडे शिवम कोविड केयर सेंटर, सारा हॉस्पिटल आणि ऍक्सन कोविड केयर सेंटर ला कारवाईचा फटका बसला आहे . तर शहरातील डॉ विवेक चौधरी यांच्याबद्दल जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून अलीकडे कोविड रुग्णांकडून कोणत्या व कशाप्रकारे फी (शुल्क)आकारावे याबद्दल आदेश जारी केलेआहेत .हॉस्पिटल कोणतेही असो,केयर सेंटर असो त्यांना हे शुल्क बंधनकारक आहेत .विशेषकरून रुग्णांच्या स्थितीचा गैरफायदा घेणार्या डॉक्टर मंडळींसाठी ते चांगले म्हणावे तरीही कमाईच्या उद्देशातून ही डॉक्टर मंडळी त्या निर्देशांना हरताळ फासत असल्याचे समोर आले आहे ,. रावेरच्या रुग्णांकडून शासकीय नियमापेक्षा अधिक शुल्क आकारणार्या शिवम कोविड सेंटर ला हा दणका बसला आहे .त्यांनी शासकीय नियमापेक्षा ६६ हजार ३०० रुपये रुग्णांकडून जादा घेतले होते . त्याबद्दल तक्रार झालीय. लेखपरिक्षणात हे उघड झाल्याने गैर प्रकार उघड झाला . त्यापूर्वी येथील सारा हॉस्पिटल मध्येही असाच प्रकार घडला होता. रुग्णाने जास्त बिलाबद्दल तक्रार करताच एक लाख रुपये बिल कमी झाले .
शहरातील प्रसिद्ध ऍक्सन कोविड केयर हॉस्पिटल मध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने त्या रुग्णालयाची कोविड मान्यताच रद्द करण्यात आली आहे .
दरम्यान शेंदूर्णी येथील ऐका वृद्धास त्रास होत असल्याने त्यास डॉ विवेक चौधरी यांच्याकडे उपचारार्थ आणले असता आधी ३० हजार रुपये आगाऊ जमा करण्यास सांगितले गेल्याचा आरोप व तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे .१३ एप्रिल च्या रात्री या रुग्णास दवाखान्यात आणण्यात आले होते .त्यांची अँटिजेन टेस्ट झाल्यावर आधी ३० हजार भरण्यास सांगण्यात आले .पण रात्रीची वेळ असल्याने नातलगांना ते शक्य नव्हते . तथापि पैसे नसल्याने डॉक्टर चौधरी यांनी उपचार्| नाकारल्याची तक्रार करण्यात आली आहे . हे सर्व डॉक्टर चौधरी यांनी फेटाळून लावले आहे .
अवैध,अनैतिक,गैर मार्गांनी पैसे कामावल्यास तो भ्रष्टाचार ठरतो . जो नियमाला धरून , ठराविक रित्या पैसे कमवितो तो योग्य म्हटला जातो . शासकीय , सहकारी कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळल्याचे सर्वच म्हणतात . मग डॉक्टर अव्वाच्या सव्वा पैसे कमावतात शासनाने ठरवुन दिल्यापेक्षा जास्त बिल घेतात तोही भ्रष्टाचारच ठरतो .या लोकांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे .सद्य स्थिती भयंकर आहे .लोकांमध्ये कोरोनाची धास्ती आणि भीतीही आहे.
अशावेळी डॉक्टरांनी सेवधर्म बजावला पाहिजे .रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले पाहिजे, सेवाधर्म म्हणून कर्तव्य बजावले पाहिजे .तेव्हाच रुग्णांनाही हायसे वाटेल, मात्र रुग्णांच्या स्थितीचा गैरफायदा घेत कमाईकरणारांना जागा दाखविलीच पाहिजे .अरे डॉक्टरांनो तुम्हाला कमाई करण्यास पुढे आयुष्य आहे .भरपूर कमाई करा.पण गैर मार्ग अवलंबू नका .सेवा धर्म बजवा .लोक तुम्हाला देव मानतात हे लक्षात घ्या.