जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, २ कैद्यांनी केला खून; कळंबा कारागृहात खळबळ

0
31

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात एका कैद्याची अन्य दोन कैद्यांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीच्या हत्या प्रकरणात हा कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मुलांनी आणि नातेवाईकांनी त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिल्याने पोलिसांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

 कोल्हापूर:   किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कळंबा कारागृहातील दोन कैद्यांनी अन्य एका कैद्याचा खून केल्याची घटना दोन दिवसांनंतर उघडकीस आली. यामुळे कारागृहात खळबळ उडाली असून, त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. उमेश राजाराम सामंत असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परूळे मांजर्डेवाडी येथील उमेश सामंत हा गेल्या सात वर्षापासून कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पत्नीचा खून केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने २०१३ साली त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो शिक्षा भोगत होता. रविवारी दुपारी कारागृहातील जनावरांच्या गोठ्यात जनावरांना चारा घालताना त्याचा दोन सहकाऱ्याबरोबर किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून त्याचा खून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

रविवारी गोठ्याजवळ चक्कर येऊन सामंत खाली पडला. तेथेच त्याचा मृत्यू झाला असे सहकारी कैद्यांनी सांगितले होते. त्यानंतर सरकारी रूग्णालयात मृतदेहाची अंतिम तपासणी केली असता, त्याच्या बरगड्यांना इजा झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यामुळे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. त्यामध्ये त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन सहकाऱ्यांसोबत झालेल्या वादातूनच हा खून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे त्या दोघांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया रात्री सुरू करण्यात आली.

याबाबत करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले की, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सामंत याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या दोन्ही बाजूच्या बरगड्यांना मार लागला आहे. खूनाचा संशय आल्याने कारागृहात जाऊन अनेक कैद्यांची चौकशी केली. यावेळी विसंगत उत्तरे दिल्याने संशय बळावला.

कोण होता सामंत?

मृत सामंत हा एसटी महामंडळात वाहक होता. त्याने आपल्या मामाच्या मुलीशीच विवाह केला होता. किरकोळ कारणातून त्याने पत्नीचा खून केला. त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. खूनाचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी नातेवाईक व त्याच्या मुलांना कळवले. पण मुलांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यामुळे मंगळवारी त्याच्यावर पोलिसांनीच अंत्यसंस्कार केले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या घटनेने कळंबा कारागृहात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here