जळगाव : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने रात्री ११ वाजेच्या सुमारास भव्य मशाल रॅली काढत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजीनगरपासून शिवतिर्थ मैदानापर्यंत मिरवणूक काढत रात्री १२ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल रात्री अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने रात्रीच शिवजयंती महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वात भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मशाल रॅलीमध्ये शेकडो तरुणांसह कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला. मशाल रॅली ढोल ताशाच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवाजीनगरमधून मार्गस्थ झाली. रॅलीची सरुवात शिवाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत सुरु झाली. रॅली गेंदालाल मिलमार्गे रेल्वे स्थानकाच्या पलिकडे गेली. त्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत अभिवादन करण्यात आले. येथून ही रॅली नेहरु चौक मार्गे शिवतिर्थ मैदानाकडे गेली. शिवतिर्थ मैदानावर रात्री बरोबर १२ वाजेच्या सुमारास मशाल रॅली पोहचली होती. याठिकाणी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत जल्लोष केला. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, शिवा की जय बोलो, संभा की जय बोलो अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला होता. यावेळी शिवतिर्थ मैदानावर शेकडो तरुणांच्या घोषणांनी चैतन्याचे वातावरण पसरले होते.
