चोपडा : प्रतिनिधी
शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीद्वारा आयोजित मुख्य कार्यक्रमात ‘झुलवा पाळणाने` या गीतावर अद्भूत असा देखावा निर्माण करीत दिमाखदार शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या अनोख्या दिमाखदार सोहळ्याने अनेकांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ माँ साहेब यांची वेशभूषा धारण केलेले हितेश लोहार व गायत्री राठोड यांना रथावर आरूढ करून ढोल-ताशांच्या गजरात लेझीम पथक संचलनाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणण्यात आले व तेथे कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी ‘माझे आरोग्य माझी जबाबदारी, मास्क लावा नाका तोंडाला पळवून लावा कोरोनाला, माझे कुटुंब माझी जबाबदारी` असे फलक लावून कोरोना प्रतिबंधाविषयी जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एच.बी.मोरे यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अनेकांनी आपल्या भ्रमणध्वनीवर चित्रीकरण केले. यावेळी कस्तुरबा माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.