चोपडा, प्रतिनिधी । येथील नगर परिषद रुग्णालय व महिला मंडळ माध्यमिक विद्यालय यांच्या सहयोगाने १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेत विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या २२२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस यशस्वीरित्या देण्यात आला. यावेळी योग्य ती काळजी घेत व विद्यार्थ्यांचे लस दिल्यानंतर काही काळ निरीक्षण करण्यात आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेची सुरुवात महिला मंडळ माध्यमिक विद्यालयापासून करण्यात आली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, भीती असे संमिश्र वातावरण होते. आपण ‘लसवंत’ झाल्याचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. प्रारंभी विद्यार्थ्यांना लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली.
नगर परिषद रुग्णालयातील अधीपरिचारक सचिन शिंदे, परिचारिका दिपाली सोनवणे, प्रतिभा पाटील, आशा वर्कर वर्षा धनगर, वैशाली चौधरी यांनी लसीकरण कामी परिश्रम घेतले. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी पर्यवेक्षक, दीपक शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सुनील पाटील, चंद्रकांत चौधरी, अनिल महाजन, संजय सोनवणे यांनी परिश्रम घेतले.