जळगाव ः प्रतिनिधी
कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अगोदरच आर्थिक कंबरडे मोडलेल्या चित्रपटगृह चालकांना आता पुन्हा चित्रपटगृहांवर बंदी आणून त्यांच्यासह कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवनातून उठविण्याचे कटू निर्णय न घेता चित्रपटगृहांना कोरोनाचे नियम पाळत,क्षमतेच्या टक्केवारीत व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे.
जिल्हाधिकार्यांनी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आजपासून काही नियम व अटी लागू केल्या आहेत त्यात चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत मात्र लग्न सोहळे व ंमंगलकार्यालयांना काही मर्यादित संख्येपर्यंत परवानगी दिली आहे.हेच धोरण चित्रपटगृहांबाबत घेतले तर चित्रपटगृहातील कर्मचायांवर उपासमारीची वेळ येणार नाही.तसेच नुकत्याच सुरु झालेल्या चित्रपटगृहांना जीवदान मिळेल.
याबाबत शहरातील चित्रपटगृह चालकांचे शिष्टमंडळ आज दुपारी जिल्हाधिकायांची भेट घेऊन त्यांना ही समस्या समजावून सांगणार असल्याचे राजकमल टॉकीजचे संचालक महेंद्र लुंकड यांनी साईमतशी बोलतांना सांगितले. अगोदरच प्रेक्षकांनी चित्रपटगृगहांंकडे पाठ फिरवली असतांना,चालक कसेबसे चित्रपटगृहे चालवून कर्मचार्यांच्या उपजिविकेकडे ध्यान देत असतांना पुन्हा चित्रपटगृहे बंदचा निर्णय अनेकांचे संसारावर गदा आणणारा ठरणार आहे.त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करुन जिल्हाधिकार्यांनी चित्रपटगृह क्षमतेच्या १५ ते २० टक्के प्रेक्षकांसाठी परवानगी द्यावी तसेच रोजचे किती शो करावयाचे हे निश्चित करुन दिल्यास चित्रपटगृह चालक कोरोना संकटाचे सर्व नियम व निर्बंधांचे पालन करतील अशी ग्वाही महेंद्र लुंकड यांनी दिली आहे.