मुंबई : प्रतिनिधी
करोनाच्या दुसऱ्या लाटेत (Coronavirus Second Wave) राज्यभरात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला. परिणामी अनेक ठिकाणी उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. विशेषत: ग्रामीण भागात मृत्यूंचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं. महाराष्ट्रातील तब्बल १२ जिल्ह्यांमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूंचं प्रमाण दुप्पट झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.
राज्यातील सिंधुदुर्ग, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यांत मृत्यूची संख्या पहिल्यापेक्षा दुप्पट झाली आहे.
शहरी भागात दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र ग्रामीण भागाच्या तुलनेत चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णसंख्या वाढूनही शहरात मृत्यूंचं प्रमाण फारसं वाढलं नाही. दुसरीकडे, ग्रामीण महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी दिसत असली तरीही कमी प्रमाणात होणाऱ्या करोना चाचण्या आणि उपचारांसाठीच्या सुविधांचा अभाव यामुळे मृत्यूसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
रुग्णसंख्या घटली की वाढली? जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय घडलं…
पहिल्या लाटेशी तुलना करता राज्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथे उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. तर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जालना, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली येथे हे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, तज्ज्ञांनी आता करोनाच्या तिसऱ्या लाटेचाही इशारा दिला आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली गंभीर स्थिती टाळायची असेल तर प्रशासनाला आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर द्यावा लागेल. अन्यथा ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण आटोक्यात ठेवणं कठीण जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.