चाळीसगाव ः प्रतिनिधी
चाळीसगांव तालुक्यातील सात महसूल मंडळांपैकी पाच मंडळात सोमवारी मध्यरात्रीनंतर अतिवृष्टी झाल्यामुळे दोन नद्यांना आलेल्या पुरात तालुक्यातील ३३ गावांसह शहरातही पाणी शिरले आहे. औट्रम घाटात दरडी कोसळल्यामुळे चाळीसगावहून औरंगाबादला जाणारा रस्ता बंद झाला आहे. पुराच्या पाण्यात ६५ वर्षीय महिला वाहून गेली असून दरडीबरोबर दरीत कोसळलेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. आणखी एक प्रौढ व्यक्ती वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी पाहिले असून वृद्धेसह त्याचाही शोध लागलेला नाही. साडेसहाशेपेक्षा अधिक जनावरे या पुरात मृत्यूमुखी पडली असून सहाशेहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. शेजारच्या भडगाव आणि पाचोरा तालुक्यातही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दरम्यान, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
पावसापासून वंचित असलेल्या जळगाव जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे. चाळीसगावसह भडगाव आणि पाचोरा तालुक्यांच्या पट्ट्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर अचानक वाढला. चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव या महसूल मंडळात १४५ मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळला. याशिवाय खडकी मंडळात ९७, चाळीसगाव मंडळात ९२, हातले मंडळात ८० तर शिरसगाव मंडळात ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या विक्रमी पावसामुळे तितूर आणि डोंगरी या नद्यांना अचानक महापूर आला आणि काठावरच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले. चाळीसगाव शहरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे हाहाकार माजला. महसूल विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यातील ३२ तर भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील सहा अशी ३८ गावे बाधित झाली आहेत. ३८ घरे कोसळली असून ६३७ घरांचे नुकसान झाले आहे. ५०६ मोठी तर १५५ लहान जनावरे वाहून गेली अथवा मृत्यूमुखी पडली आहेत. ३०० दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. या प्राथमिक अहवालानुसार चाळीसगाव तालुक्यातील सुमारे १६ हजार हेक्टर शेतातील उभ्या पिकाचे या महापुराने नुकसान केले आहे.
तसेच चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील कमलबाई पांचाळ ही ६५ वर्षे वयाची महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली असून तसा अहवाल संबंधित प्रांताधिकार्यांनी पाठवला आहे. या शिवाय एक इसम पुराच्या पाण्यात वाहत गेल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तो कुठला होता, कोण होता, याविषयी काहीही माहिती नाही. या व्यक्ती सापडल्या नसल्याने त्यांचा शोध सुरू आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चाळीसगावहून औरंगाबादकडे जाताना लागणार्या औट्रम घाटात मध्यरात्री मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. या दरडीबरोबर एक ट्रक दरीत कोसळला असून ट्रकमधून म्हशींची वाहतूक करण्यात येत होती. त्या म्हशी ठार झाल्या असून ट्रक चालकाचाही मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ट्रकच्या क्लिनरने उडी मारल्यामुळे तो वाचल्याचे सांगण्यात आले. दरडी कोसळल्यामुळे अनेक वाहने त्यात फसली आहेत. या वाहनांमध्ये फसलेल्या सुमारे ८० जणांची राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी सुटका केली.
घाटात कोसळलेल्या दरडींमध्ये मोठ्या शिळा आणि माती, चिखल, झाडे यांचा समावेश आहे. रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. दरडी हटवून रस्ता दुरूस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी चार जेसीबी, दोन क्रेन, अनेक डंपर्स यांच्या सहायाने ५० मजुरांनी काम सुरू केले आहे. तरीही किमान चार ते पाच दिवस रस्ता वाहतूक सुरू व्हायला लागतील, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणार्या औरंगाबाद विभागाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले. दरडी कोसळणे आणि पावसाच्या पाण्याचा वेग यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला असून काही ठिकाणी रस्ताच वाहून गेल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे नेमकी किती हानी झाली आहे हे संपूर्ण पाहाणीनंतरच स्पष्ट होईल्, असेही काळे यांनी सांगितले.
तितूर नदिला महापूर; कजगाव-नागद मार्गाचा संपर्क तुटला
कजगाव : दि.३१ रोजी आलेल्या तितुर नदीच्या महापुरामुळे कजगाव-नागद या मार्गाचा संपर्क तुटला. तसेच कजगाव, भोरटेक, पासर्डी, घुसर्डी या गावाला पुराने वेढा दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर नदी किनार्यावरील अनेक शेतातील पीक या पुराने वाहून गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दि.३० च्या रात्री तितुर नदीच्या उगमवर झालेल्या धुवांधार पावसामुळे तितूर नदीला महापूर आल्याने तितूर काठावरील अनेक शेतकर्यांचे पीक या पुरात उपटुन पुराच्या प्रवाहात वाहून गेलीत. तर अनेक शेतामध्ये नाले तयार झाल्याने जमिनी नापीक होतील. कारण मातीचा थरच या प्रवाहात वाहुन गेला आहे. महापुराने रुद्ररूप धारण केले होते. कजगावात उभ्या असलेल्या अंदाजे ४० ते ५० फुट उंचीच्या केटीवेअरवरून पुराच्या पाण्याचा विसर्ग सुरू होता. या महापुरामुळे कजगाव-नागद मार्ग बंद पडल्यामुळे कजगाव-नागद मार्ग बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर या पुराने कजगाव, जुनेगाव, नवेगाव हा संपर्क देखील तुटला होता.
शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
तितूर काठावर असलेल्या जमिनीतील पीक या महापुराने गिळंकृत केली. हातातोंडाशी आलेला घास या पुराने हिरावल्यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडणार आहे.
रात्री झालेल्या धुवांधार पावसामुळे दुकानांमध्ये पाणी
पावसाळा सुरू झाल्यानंतर कजगावात दि.३० रोजी रात्री साधारण १० वाजेच्या दरम्यान झालेल्या धुवांधार पावसामुळे येथील बसस्थानक भागातील व्यापारी संकुलात पाणी गेल्याने या संकुलातील दुर्गेश कृषी सेवा केंद्र, प्रसाद आटो, गौरव बुट हाऊस, सुहाग जनरल स्टोअर्स, श्री जनरल स्टोअर्स, परफेक्ट जीन्स कॉर्नर या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रांताधिकारी पोलीस निरीक्षकांची भेट
पुरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी पाचोरा प्रांताधिकारी डॉ.बांदल, पोलीस निरीक्षक पडघम भडगाव, नायब तहसिलदार देवकर, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी भेट देऊन पाहणी केली व सुचना दिल्या.
अनिल महाजन यांनी केली जेवणाची व्यवस्था
कजगाव येथील मराठी शाळेच्या मागील भागात काही घरात पुराचे पाणी घुसल्याने काही कुटुंबाचा सारा संसार ओला झाल्याने कजगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल रघुनाथ महाजन यांनी या सार्याची जेवणाची व्यवस्था केली.
हिवरा, सार्वे-खाजोळे प्रकल्प ओव्हरफ्लो
पाचोरा तालुक्यातील अजिंठा डोंगरमाळा लगत असलेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने तालुक्यातील हिवरा, सार्वे-खाजोळे हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. सातगाव (डोंगरी), घोडसगाव, धाकलेगाव, कोल्हे, लोहारा, बहुळा प्रकल्पाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. तर चाळीसगाव तालुक्यातील वरील भागात अतिवृष्टी होऊन तितूर व गडद नदीला मोठा पूर आल्याने व हिरा प्रकल्प ओव्हरफ्लो होवून एक फूट वहू लागल्याने प्रकल्पाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील तितूर नदीचे पाणी गिरणेत आल्याने तितूर नदीवरील नगरदेवळा स्टेशनजवळ व पाचोरा तालुक्यातील ओझर, गिरड गावांच्या मध्यभागी असलेल्या पुलांवरून पाणी वाहू लागल्याने रहदारी बंद झाली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी भडगाव येथे भेट देवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या पुरामुळे तालुक्यात सुदैवाने कोठेही जिवीतहानी झालेली नाही.
वाडी-बनोटी प्रकल्प वाहतोय ओसंडून
पाचोरा तालुक्यालगत असलेल्लया सोयगाव तालुक्यात वाडी-बनोटी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने वाडी-बनोटी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. ते पाणी थेट हिवरा प्रकल्पात येत असल्याने हिवरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. याशिवाय शिंदाड, वडगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे सार्वे-खाजोळे प्रकल्प ओव्हरफ्लो होवून गडद नदिला पूर आला आहे. याशिवाय मुर्डेश्वर व जोगेश्वरी भागात पाऊस झाल्याने सातगाव (डोंगरी), घोडसगाव, धाकलेगाव प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. तितूर नरदिला मोठा पूर सुरू असल्याने घुसर्डी, होळ, वडगाव (सतीचे), नागणखेडा, बाळद बु॥ तर गिरणेला पूर आल्याने भट्टगाव, बांबरूड (महादेवाचे), पिंपळगाव खुर्द, पिंपळगाव बु॥ मांडकी, ओझर, गिरड, भातखंडे खुर्द, भातखंडे खुर्द, दुसखेडा तर हिवरा नदी लगतच्या खडकदेवळा खुर्द, खडकदेवळा बु॥ सारोळा खुर्द, सारोळा बु॥ जारगाव, कृष्णापुरी, पाचोरा शहरातील बाहेरपुरा भाग, वडगाव (टेक), वडगाव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
पाचोरा-हिवरा, सार्वे-खाजोळे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नदिकाठच्या गावांना पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.