मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईतून एका ४ महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिला विकल्याच्या आरोपाखाली ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या मुलीला ४ लाख ८० हजार रुपयांत तामिळनाडूस्थित एका सिव्हिल इंजिनियरला विकल्याचा आरोप आहे. तामिळनाडूच्या कोइम्बतूर येथून मुंबई पोलिसांच्या दोन पथकांनी या बाळाची सुटका केली, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
“आम्ही तपास करत सर्वप्रथम इब्राहिम अल्ताफ शेख (३२) नावाच्या व्यक्तीला अटक केली आणि नंतर त्याच्या चौकशीच्या आधारे सायन, धारावी, मालाड जोगेश्वरी, मुंबईतील नागपाडा आणि कल्याण आणि ठाणे येथे छापे टाकले. तिथून आणखी दोन महिला आणि चार पुरुषांना अटक करण्यात आली. त्यांनी आम्हाला सांगितले की ते बाळ ४.८ लाख रुपयांना तामिळनाडूतील एका व्यक्तीला विकले गेले आहे. तेथे दोन पथके पाठवण्यात आली आणि तीन जिल्ह्यांमध्ये चार दिवस शोध मोहीम राबविण्यात आली. नंतर मुंबई पोलिसांना कोईम्बतूरमधील सेलवनपट्टी येथून एक महिला आणि चार पुरुषांना अटक करण्यात यश आले, या सर्वांना येथे आणण्यात आले आहे,” असे पोलिसांनी सांगितले. न्यूज १८ने यासंदर्भात वृत्त दिलंय.