जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रीय पातळीवर सध्या गाजत असलेला ‘द ग्रेट इंंडियन किचन’ हा सिनेमा कथानक, दिग्दर्शकीय कौशल्य व भारतीय स्त्रियांच्या जगण्याची होणारी कोंडी दाखणारा आहे. हिंसा ही दृश्य स्वरूपात अनेकदा ठळकपणे दिसते पण या चित्रपटात घरातील न दिसणारी हिंसा दिग्दर्शकाने प्रभावीपणे दाखवली आहे. घरातली छुपी हिंसा रसिकाला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही, असे मत ज्येष्ठ सिनेअभिनेत्री वीणा जामकर यांनी परिवर्तन फिल्म क्लब आयोजित ‘चर्चा तर होणारच’ या चर्चेप्रसंगी मनोगतातून सांगितले.
घराघरातील वास्तव मांडले
टिपिकल पद्धतीने न मांडता दिग्दर्शकाने प्रत्येक फ्रेममध्ये गांभीर्याने घरात नातेसंबंधातील कळत नकळत होणारी हिंसा हा सवयीचा कसा भाग बनते, स्त्रीला स्वतःची आवडनिवड असते हे पुरुषप्रधान संस्कृतीत का स्वीकारले जात नाही? रिबेल करणारी स्त्री या सिनेमात दाखवली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक स्वतः स्त्रीचे आयुष्य जगून बघणारे दिग्दर्शक आहेत आणि हेही या सिनेमाचे वैशिष्ट्ये असल्याचे जामकर यांनी मनोगतात व्यक्त केले. या वेळी रुईया महाविद्यालयातील प्रा. गायत्री लेले यांनी स्त्रियांना त्यांच्या कामाचा मोबदला नको आहे तर घरात सन्मान, मानवी हक्क मिळणे गरजेचे असल्याचे मत नोंदवले.
नाट्यकर्मी उदय सपकाळे यांनी समतेच्या मूल्याचा व वागणुकीसाठी संवैधानिक अधिकार देऊन बाबासाहेबांनी भारतीय महिलांना संरक्षण दिल्याचे सांगितले. परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी सिनेमातील प्रसंग व दिग्दर्शकाची भूमिका, भारतीय कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांचे जगणं यावर मत व्यक्त केले. चर्चेत सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार, चित्रकार नितीन सोनवणे, प्रा. मनोज पाटील, अनुषा महाजन यांनी सहभाग घेतला. परिवर्तनच्या प्रतीक्षा कल्पना व हर्षदा कोल्हटकर यांनी सिनेमाविषयी प्रेक्षकांकडून प्रश्नावली भरून घेतल्याचे या निमित्ताने सांगण्यात आले. ऑनलाइन परिसंवादाला परिवर्तन फिल्म क्लबच्या प्रमुख सुदिप्ता सरकार, विकास मलारा, विनोद पाटील, मंजूषा भिडे, हेमंत भिडे आदी उपस्थित होते. प्रतीक्षा कल्पराज यांनी सूत्रसंचालन केले.