ग.स.सोसायटी : सहकारात असहकार !; सत्तेचा हव्यास; विश्वासघाताचे राजकारण

0
31

जळगाव ः विशेष प्रतिनिधी
जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच गव्हर्नमेंट सर्व्हन्ट सोसायटी अर्थात ग.स सोसायटीत सध्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ता संघर्ष सुरू झाला आहे.संचालकांनी अध्यक्षांवर आरोप करून राजीनामे देण्याची घटना ताजी असतांनाच दुसर्‍या गटाने अध्यक्ष मनोज पाटलांना तीन अपत्य असल्याची तक्रार केली.त्यात सहकार उपनिबंधकांनी अल्प मतात आल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमले.नंतर दुखावलेल्या पदच्युत अध्यक्षाने दुसर्‍या माजी अध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.या गटातून त्या गटात,विश्वासघात आणि दगाबाजी असा सातत्याने घटनाक्रम चालणार्‍या या संस्थेत असहकार फोफावला आहे.येथे राजकारण स्वार्थी अन् मतलबी झाले असून पोरखेळ चालल्याचे चित्र आहे.
सभासदांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार काय असतो ते ग.स.सोसायटीत सध्या चाललेल्या घटनाक्रमावरून लक्षात येते.जवळपास ४० हजारावर सदस्य संख्या असल्या कारणाने या सहकारी संस्थेची व्याप्ती लक्षणीय म्हटली जाते.बहुतांश शिक्षक वर्ग या संस्थेचे सभासद असल्याने आधी शिक्षकांची सोसायटी म्हणून या संस्थेची ओळख होती.पुढे राज्य सरकारी,निमसरकारी कार्यालयातील कर्मचारी संस्थेचे सदस्य झाल्याने गव्हर्नमेंट सर्व्हन्ट (ग,स)म्हणून संस्थेचा नामोल्लेख होत गेला.सरकारी कर्मचारी सदस्य असल्याने दिलेल्या
कर्जाची १०० टक्के वसुली होते.त्यामुळे कोट्यवधींचा व्यवहार असणारी ही सोसायटी असली तरीही भ्रष्टाचार तितकाच अधोरेखित होतो असे म्हणतात.
या संस्थेचे संचालक होण्यासाठी वाट्टेल ते केले जाते.कारण पाच वर्षात व्याजासह पैसे वसूल होतात म्हणे.या संस्थेत कोण कोणत्या गटातून निवडून येतो,नंतर कोणत्या गटात जातो की अति महत्वाकांक्षेपोटी वेगळाच गट स्थापन करतो.गटातून गट निर्माण करण्याचे प्रकार सुद्धा येथे सर्रास आहेत.तसाच प्रकार सध्या ग.स.त सुरू आहे.
२०१५ च्या निवडणुकीत बी.बी पाटील यांच्या नेतृत्वातील सहकार गटाने विरोधी सर्व गटांचा पराभव करून सर्व २१ जागा जिंकल्या होत्या. आताचे मावळते अध्यक्ष मनोज पाटील सुद्धा त्याच गटातून सर्वप्रथम निवडून आले होते.तेव्हा पहिल्या वर्षी सुनील सूर्यवंशी ,दुसर्‍या वेळी तुकाराम बोरोले आणि तिसर्‍या वेळी विलास नेरकर यांना अध्यक्षपद सर्वानुमते बहाल करण्यात आले होते.त्यानंतर बी.बी पाटील यांचे विश्वासू सहकारी मनपातील उदय पाटील यांचे नाव निश्चित असतांनाच अति महत्वाकांक्षेपोटी प्रथमच याच गटातून निवडून आलेल्या मनोज पाटील यांनी सहकार मधून १२ संचालक फोडले व स्वतःच अध्यक्ष झाले.माजी अध्यक्ष विलास नेरकर हेही त्याच्यासोबत गेले होते.
या मनोज पाटलांचा कार्यकाळ गेल्याच वर्षी संपला पण कोरोनामुळे त्यांना मुदत वाढ मिळाली.त्यांच्या लोकसहकार गटाचे अध्यक्ष नेरकर होते.पहा त्याच नेरकरांसह पाच संचालक व विरोधातील ९ अशा १४ संचालकांनी मनोज पाटलांवर मनमानी चा आरोप करून
राजीनामे दिले. मनोज पटलांकडे उरले फक्त ७ चे संख्याबळ.ते अल्पमतात असल्याने संस्था बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी झाली.आणि त्याचवेळी मनोज पाटील यांना तीन अपत्य असल्याने त्यांना अपात्र करण्याचीही मागणी झाली.जिल्हा उपनिबंधकांनी संस्था बरखास्त करून प्रशासक बसविले असून मनोज पाटलांचे पद तर गेले, आता तिसर्‍या अपत्याने त्यांची अडचण वाढविली आहे.
या दुहेरी मार्‍यामुळे मेटाकुटीस आलेल्या मनोज पाटील यांनी त्यांची साथसंगत करणार्‍या लोकसहकारचे अध्यक्षपद भूषविणार्‍या विलास नेरकरांवर नोकरभरती प्रकरणी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.सोसायटीत वरील कार्यकाळात ६३ कर्मचार्‍यांची भरती झाली त्यांच्याकडून प्रत्येकी ६ लाख घेतल्याची अधिकृत माहिती मिळते.६३ गुणीला ६ लाख म्हणजे तब्बल ३ कोटी ७८ लाख होतात. हा मलिदा कोणी पचविला याबाबत चर्चा रंगली आहे.
वरील ६३ कर्मचार्‍यात एक सहकारचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगतात.त्याच्याकडून ६ लाख मिळत नव्हते .त्याच्याजवळ इतके पैसेही नव्हते. तेव्हा त्यास संस्थेतूनच कर्ज काढायला लावले.त्याच रुपयांवरून विलास नेरकर आणि मनोज पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे काही संचालक सांगतात.खरे-खोटे तेच जाणोत पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर सारे चालले आहे. साराच असहकार म्हणावा. आगामी निवडणुकीसाठी सहकार, लोकसहकार, प्रगती, लोकमान्य आणि महाआघाडी हे गट सरसावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here