जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात संथगतीने असलेले मतदान आता जोर धरू लागले आहे. जिल्ह्यातील ५ हजार १५५ जागांसाठी रिंगणात उतरलेल्या १३ हजार २४७ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद होत आहे.जिल्ह्यातील २ हजार ४१५ केंद्रांवर १३ लाख ४ हजार ९२३ मतदार आपला कौल नोंदवित आहेत. दरम्यान, धुळे जिल्ह्यात १८१ तर नंदुरबार जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू आहे.
आज सकाळी ७.३० वाजता जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. ७.३० ते ९.३० या पहिल्या टपप्यात मतदान संथगतीने सुरू होते. मात्र त्यानंतर मतदान केंद्रांवर हळूहळू पुरूष व महिला मतदारांची रीघ लागल्याचे दिसून आले. जिल्ह्यात बहुसंख्य ग्रामपंचायत निवडणुकीत अटीतटीची चुरस असल्यामुळे मतदान केंद्रांबाहेर उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी दिसून आली. दुपारी १.३० नंतर काही केंद्रांवर ३० ते ३५ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. तर काही केंद्रांवर १८ ते २५ टक्के मतदान झाल्याचे साईमत प्रतिनिधींनी सांगितले. पाचोरा तालुक्यात सर्वात जास्त ९६, तर भुसावळ तालुक्यात सर्वात कमी म्हणजे २६ ग्रा.पं.साठी निवडणूक होत आहे. ग्रा.पं. निवडणुकीसाठी एसआरपीचे ५ प्लॉटून व ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. येत्या १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.
दरम्यान पाळधी खुर्द येथे दुपारी १२.३० पर्यंत प्रभाग क्र. ३ वर ३६३ मतदारांनी तर ४ मध्ये ५९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. धरणगाव पं.स.चे सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनीभेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तहसिलदार नितीन देवरे, नायब तहसिलदार प्रथमेश मोहोड, तलाठी प्रशांत पाटील, कोतवाल धनराज भोई आदींनी चोख कर्तव्य बजावले.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव ंयेथे मतदारांचा उत्साह दिसून आला. सरपंच अनिल पाटील, उपसरपंच शकील पटेल यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राबाहेर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर येणार्या मतदारांच्या तापमानाची तपासणी करण्यात येत होती.