जळगाव : प्रतिनिधी
कडगाव येथील ग्रामसेवक कुंदन कुमावत यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी काही ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने करीत गटविकास अधिकारी एस. बी. सोनवणे यांना निवेदन दिले. तालुका कॉग्रेस कमिटीने याकामी पुढाकार घेतला.
कुमावत यांनी नियमबाह्य कामास विरोध केल्याने पोलिस पाटलासह काही पदाधिकार्यांनी ग्रामसेवकांना धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. कुमावत हे गावात विविध योजनांचे काम करीत असताना त्यांना विरोध केला जात आहे. त्यामुळे पंचायत समितीने दबावाखाली न येता नियमाप्रमाणे काम करणार्या ग्रामसेवकांची बदली करू नये, त्यांना गावातच पुर्ननियुक्ती द्यावी अशी मागणीही निवदेनकर्त्यांनी केली. या वेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, मुरलीधर सपकाळे, प्रमोद घुगे, धनराज जाधव, रवींद्र कोळी, शिवदास कोळी, अशोक कोळी, लताबाई कोळी, सिंधुबाई कोळी, साधना कोळी, कल्पना कोळी यांनी हे निवेदन दिले. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी सोनवणे यांनी दिले.