ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिन्स झाले सील

0
42

जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आज मंगळवारी सकाळी ८ वाजता नूतन मराठा महाविद्यालयात ईव्हीएम मशीन सील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी तहसिलदार नामदेव पाटील यांच्यासह अधिकारी व तालुक्यातील निवडणूक लढवणारे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जळगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक चिन्ह प्राप्त होताच निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला असल्याने गावागावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचवेळी प्रशासनाने निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू केली असून, आज सकाळी ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. नूतन मराठा महाविद्यालय येथे सुमारे ३० टेबलवर मास्टर ट्रेनरच्या साह्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी ईव्हीएम मशीन सील केले. या वेळी ईव्हीएम मशीनवर संबंधित प्रभागाची मतपत्रिका चिकटवून उमेदवारांची नावे सेट करण्याची महत्त्वाची प्रक्रिया राबवण्यात आली.
आसोदा, आव्हाणे संवेदनशील ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील आसोदा, आव्हाणे यासह अन्य काही संवेदनशील गावांमध्ये अतिरिक्त कर्मचारी कुमक पाठवली जाणार आहे. यासह पोलिस दलाकडून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था मागवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.जळगाव तालुक्यातील १७० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी १७० बॅलेट युनिट व १७० सीलिंग युनिट यासह दोन्ही युनिट १० टक्के अतिरिक्त ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ९५० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. मतदानयंत्र साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी स्कूल बसेससह दोन एसटी बसेस तसेच खासगी क्रूझर गाड्यांचा उपयोग केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here