गाळेधारक उद्यापासून बेमुदत बंद पुकारणार

0
22

जळगाव : प्रतिनिधी
महापालिकेने गाळेधारकांना बजावलेली बिले अवाजवी असल्याने लाखो रूपये भरणे शक्य होणार नाही. प्रशासनाने सोमवारपासून गाळे सील करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या निर्णयाची प्रतिक्षा करायला तयार नाही. गाळेधारकांवर मोठे संकट उभे राहणार असल्याने शुक्रवारपासून (दि.५ मार्च) चौदा व्यापारी संकुलातील सर्व गाळे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.
महापालिका प्रशासनाने व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांना थकीत रकमा भरण्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा सोमवारपासून गाळे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बुधवारी दुपारी पत्रकार परिषद झाली. या वेळी पांडुरंग काळे, राजस कोतवाल, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, विलास सांगोरे, राजेश पिंगळे, रिजवान जहागीरदार उपस्थित होते. राज्यातील २७ महापालिका क्षेत्रात गाळ्यांचा प्रश्न तिव्र आहे. परंतु जळगावची एकमेव पालिका गाळेधारकंसोबत क्रुरपध्दतीने वागत आहे. मनपाने गाळेधारकांच्या भाड्यात दुप्पट वाढ करावी अशी मागणी करत पैसे भरतो आणि चाव्या प्रशासनाच्या हातात देण्याची तयारी असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगीतले.
महापालिकेच्या मालकीच्या २३ संकुलांची मुदत संपली असली तरी १४ व्यापारी संकुल हे अव्यावसायीक दर्जाची आहेत. या ठिकाणी व्यवसाय करणारे गाळेधारक अत्यंत गरीब आहेत. त्यांची बिले कमी करून द्यावी अथवा निर्लेखित करावी अशी मागणी केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा झाली असून नगरविकास मंत्र्यांसोबत बैठक केली जाणार आहे.
आमदार सुरेश भोळे यांनी निवडणूक जवळ आली की गाळेधारकांना आश्वासन दिले होते. परंतु दोन निवडणुका होऊनही आश्वासन पूर्ण केलेले नाही. लोकप्रतिनिधींकडून सातत्याने विश्वासघात झाल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केला. गेली पाच वर्ष भाजपाची सत्ता असताना कोणताही फायदा होऊ शकला नसून आता विरोधात असताना काय चमत्कार घडेल अशी टिका केली.
प्रशासन गाळेधारकांचा कोणताही विचार करत नसल्याने चौबे मार्केट, भोईटे मार्केट, जुने बी.जे.मार्केट, डॉ. आंबेडकर मार्केट, वालेचा मार्केट, छत्रपती शाहु महाराज मार्केट, शिवाजीनगर मार्केट, भास्कर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, निर्मलाबाई लाठी शाळा इमारत, शामा प्रसाद मुखर्जी मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, जुने शाहु मार्केट, धर्मशाळा मार्केट, गेंदालाल मिल कॉम्प्लेक्स या चौदा मार्केटमधील गाळेधारक शुक्रवारपासून बेमुदत दुकाने बंद ठेवणार आहेत. गरज भासल्यास कुटुंबियांसह रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. कोरोना काळात काही विपरीत घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here