जळगाव ः प्रतिनिधी
अंजोर प्रकाशन,औरंगाबादच्या वतीने खानदेशकन्या कवयित्री बहिणाबाईं चौधरी यांच्या १४० व्या जयंतीवर्षानिमित्त ‘गारुड’ हा हस्तलिखित डिजिटल विशेषांक काढण्यात आला असून वाचकांना त्याचे पीडीएफ व्हाँट्सअँपवर ९०४९६७९७९० या मोबाईल क्रमांकावरून उपलब्ध करून देण्यात येईल.या अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा नुकताच झाला.विशेष म्हणजे हा अंक कवयित्री व लेखिका कविता महाजन ह्यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आला आहे.
प्रा.सुरेखा दंडारे वसेकर व अशोक दंडारे यांनी दीपप्रज्ज्वलन आणि बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला.चित्रलेखा मेढेकर यांनी शारदास्तवन तर अंकिता मुळे हिने सरस्वती कौतुकम हे नृत्य सादर केले.त्यानंतर बहिणाबाईंवरील स्वरचित कविता वाचन प्रतिभा धामणे व इतरांनी केले.प्रास्ताविक सुरेखा दंडारे वसेकर यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रदीप पाटील यांनी या अंकास स्वहस्ताक्षरात शुभेच्छा दिल्या असून हा अंक संदर्भग्रंथाचे मूल्य प्राप्त करील, असा आशावाद व्यक्त केला आहे तसेच याच विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य दिलीप पाटील आणि बहिणाबाई चौधरी मेमोरिअल ट्रस्ट ,जळगावचे चेअरमन अशोकभाऊ जैन, सुप्रसिद्ध कवी ना. धो. महानोर, आणि अनेक ख्यातनाम साहित्यिक व मान्यवरांनी स्व-हस्ताक्षरात शुभेच्छापत्रे दिल्यामुळे त्यांच्या हस्ताक्षरांचे जतन करण्याची संधी यानिमित्ताने लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका डॉ. वृषाली किन्हाळकर (नांदेड) यांनी आपल्या भाषणातून या कार्यक्रमास लोकार्पण सोहळा असे म्हटले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते धरणगावचे हभप प्रा.सी.एस.पाटील हे होते तर प्रमुख अतिथी प्रा.लीला शिंदे, कविता निरखी, रझिया पटेल, डॉ.जीवन पिंपळवाडकर व श्रीकांत उमरीकर यांची उपस्थिती होती.या सर्वांनी अंकाबद्दल आणि सुरेखा दंडारे व कुटुंबियांनी केलेल्या या अभिनव उपक्रमाविषयी गौरवोद्गार काढले.
या अंकात वय वर्षे ११ ते ९० पर्यंतच्या व्यक्तींचा असलेला सक्रीय सहभाग उल्लेखनीय आहे. ६५१ पानी आणि ८० पेक्षा अधिक लेख असलेला हा अंक मान्यवरांच्या मते त्याच्या अभिनव व वाड.मयीन वैशिष्ट्यांमुळे साहित्य क्षेत्रात एक आगळेवेगळे स्थान निर्माण करणारा आहे. यात विविध ललित कलांचा जसे साहित्य, चित्र, नृत्य,संगीत, कॅलिग्राफी,चलचित्र यांचा सुरेख मेळ साधला गेला आहे.
झूम व फेसबूक लाइव्हच्या लिंकवरून हा अंक सर्वदूर पोहोचला.थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचे सामर्थ्य व निराळेपण निदर्शनास आणणे व कोरोनाच्या काळात आलेली मरगळ झटकून या कवयित्रींच्या चाहत्यांना व अभ्यासकांना लिहिते करणे हे उद्दिष्ट असलेल्या या अंकाला महाराष्ट्र, तेलंगणा इतकेच नव्हे तर विदेशांतूनही उदंड प्रतिसाद मिळाला.
अंकात सहभागी लेखकांच्या मनोगतपर चलचित्रांची झलकही प्रकाशन सोहळ्यात दाखविली गेली.या अंकाच्या संपादिका प्रा.सुरेखा दंडारे, प्रकाशक अशोक दंडारे , औरंगाबाद हे असून मुखपृष्ठ आणि तांत्रिक सहाय्य आर्किटेक्ट प्रतीक दंडारे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता दंडारे व्यवहारे आणि आभार प्रदर्शन प्राजक्ता शौनक देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता साना देशमुख, ठाणे हिच्या मनमंदिरा या गाण्यावरील नृत्याविष्काराने झाली. जळगावचे बहिणाई स्मृती संग्रहालयाचे समन्वयक अशोक चौधरी , प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे, प्रा. सविता सपकाळे ,सुनिल पाटील,किरण पाटील यांच्यासह इतर अनेकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.