पुणे : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री विदुषी कीर्ती शिलेदार यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सकाळी त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. मागील ६० वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयानाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिले. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. काही वेळात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.