जळगाव : प्रतिनिधी
येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे चोपडा तालुक्यातील सातपुडा परिसरस्थित शेणपाणी व गौर्यापाडा गावात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांचे आरोग्य,आहार व स्वच्छता या विषयावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच गावातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
८ मार्च रोजी महिला दिन व १० मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाच्या सुरूवातीस त्यांच्या प्रतिमेला सुती हार घालून अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच रेणुका बारेला, सदस्य गिताबाई बारेला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालय धरणगाव येथील राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रमाचे समन्वयक गणेश कुभांर यांनी ’महिलांचे आरोग्य’ याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रतिनिधी सागर चौधरी तसेच चंद्रकांत चौधरी यांनी ’आहार व स्वच्छता’ या विषयावर मार्गदर्शन केले.
महिला दिनाचे औचित्य साधत गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने गावातील आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य, समुह संशोधन व्यक्ति यांचे गावातील महिलांच्या हस्ते सुती हार देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चंद्रकांत चौधरी यांनी तर आभार सागर चौधरी यांनी व्यक्त केले.