खामखेडा येथे जुगार अड्ड्यावर धाड; आठ जणांना अटक

0
53

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
तालुक्यातील मुक्ताईनगर – खामखेडा रस्त्यावर एका डाव्या हातालगत असलेल्या डेकडीच्या मागील शेतात मोठ्या पत्री शेडमध्ये अवैधरित्या चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर जळगाव येथील गुन्हा अन्वेषण विभागाने छापा टाकला. या कारवाईत ५ लाख ६१ हजार रुपयांच्या रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईत आठ जणांना पोलिसांनी अटक केली.
एलसीबी पथकाद्वारे तीन महिन्यांपूर्वी सतत तीन ते चार दिवस अवैध धंद्यांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर पुन्हा एका जुगार अड्ड्यावर एलसीबीद्वारे छापा टाकण्यात आला. यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध व्यावसायिकांची पाचावर धारण बसली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. तालुक्यातील शेती शिवार तसेच हॉटेल, ढाबे हे अवैध धंद्यांचे अक्षरशः अड्डे बनले आहेत. या सर्वांना मुक्ताईनगर तालुक्यातील राजकीय पक्षांसह पोलीस प्रशासनाचाही छुपा पाठिंबा असल्याने दिवसेंदिवस तालुक्यातील अवैध धंद्यांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा आहे. विविध पक्षांतील काही व्यक्तींचीच भागिदारी असल्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातून अशा कारवाई होताना मात्र दिसून येत नाहीत. परंतु जिल्ह्यावरून येणारे एलसीबी पथक मात्र अशा अवैध धंद्यांवर कारवाई करते. त्यामुळे तालुक्यातील पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांपासून अनभिज्ञ आहे काय? की तालुक्यातील पोलीस प्रशासन दबावाखाली काम करते? असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आज एलसीबी पथकास गोपनीय माहिती मिळाल्याच्या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा रस्त्यावरील महादेव मंदिराच्या पुढे नदीपात्राच्या जवळ असलेल्या एका शेतामध्ये अवैद्य जुगार व्यवसाय सुरू असल्याची माहिती जळगाव गुन्हे अन्वेषण विभाग यांचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांच्यासह पथकातील विकास वाघ, संजय हिवरकर, दीपक चौधरी, राजेश मेंढे, रवी नरवाडे, रमेश चौधरी, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद लाड वंजारी, ईशांत तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
याप्रसंगी दोन लाख ८० हजार रुपये रोख रकमेसह सहा हजार रुपयांची विदेशी दारू तसेच पाच मोटरसायकल अशा एकूण पाच लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासंदर्भात एलसीबी पथकातील रवी नरवाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रसंगी अजय अरुण जावरे, मनोज जाधव, निलेश वाणी, विनोद कांडेलकर, निलेश तळेले, राजेश जावरें, शेख बिस्मिल्ला, विठ्ठल तळेले अशा आठ जणांंना अटक करून त्यांच्याविरुद्ध कारवाई त्यांविरुद्ध करण्यात आलेली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास भारसके हे करीत आहेत. दरम्यान, ही कारवाई यापुढेही चालणार काय? असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here