जळगाव ः प्रतिनिधी
येथील खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कैलास दिनकर तायडे यांची बहुमताने तर उपाध्यक्षपदी अजय आनंदराव सोमवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली.
अध्यासी अधिकारी विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड करण्यात आली. पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास तायडे हे कै. इंदिराबाई पाटणकर नवीन मराठी शाळा, शिवाजीनगर, जळगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष अजय सोमवंशी हे व्ही.एच. पटेल प्राथमिक विद्या मंदिर, चाळीसगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्था ही आपल्या सभासदांना अल्पव्याजदरात १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था आहे. संस्था कुठल्याही प्रकारच्या ठेवी न घेता आपल्या स्वबळावर कर्जवाटप करीत असते. गेल्या ३५ वर्षांपासून संस्थेचा ऑडीटवर्ग हा ‘अ’ आहे. पतसंस्था आपल्या सभासदांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित असून त्यात एखाद्या सभासदाचा दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचा मृत्यू झाल्यास सभासद वारसास कै. वि.रा. पाटील सर मृत्यूफंडातून २ लाख रुपयांची मदत देत असते. सभासदाच्या कन्येच्या विवाहासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी कन्यादान योजनेतून ५ हजार रुपयांची बिनफेडीची आर्थिक मदत देत असते.
पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कैलास तायडे व उपाध्यक्षपदी अजय सोमवंशी यांची निवड झाल्याबद्दल पतसंस्थेचे संचालक विक्रमादित्य बाबुराव पाटील, मच्छिंद्रनाथ वासुदेव पाटील, शशिकांत सुधाकर महालपुरे, रविंद्र भावसिंग पाटील, प्रसन्ना प्रभाकर बोरोले, भुपेंद्र पंडित पाटील, सौ.सरला अशोक पाटील, महेंद्रसिंग पुंडलिक पाटील, प्रशांत गजानन साखरे, मिलिंद वासुदेव पाटील, सौ. विद्या मुकेश कोल्हे, सलिम इस्माईल तडवी, देवेंद्र सुभाषचंद्र चौधरी, कैलास रामदास पाटील, रविंद्र केशव पाटील, तुकाराम केशव पाटील, अमोल पंडित भारंबे तसेच चिटणीस प्रकाश साखरे व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्रा.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक प्रभाकर मदाने तसेच जिल्हा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान सदस्य तुकाराम केशव पाटील यांनी विशेष सहकार्य केले.