खदानीत उडी घेवून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न?

0
19

जळगाव : प्रतिनिधी
येथील जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या मागील परिसरात असलेल्या खदानीत आव्हाणा रोडवरील सुदत्त कॉलनीतील रहिवासी महिलेने अचानक झोकून दिल्यामुळे काही काळ खळबळ उडाली. या महिलेने आत्महत्या करण्याचा तर प्रयत्न केला नाही, अशी शंका आल्यामुळे परिसरातील बांधकामावर वॉचमन असलेल्या एका व्यक्तीने खाली उतरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सदर महिलेला किरकोळ दुखापत झाली असून खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचारानंतर तीला मुलाने व नातेवाईकाने घरी आणले आहे.
आज पहाटे सुदत्त कॉलनीतील रहिवासी महिला जयश्री रविंद्र पाटील (वय ३९) ही घरात दिसत नसल्यामुळे तिचा मुलगा नरेंद्र पाटीलने तिचा शोध सुरु केला व आपल्या नजीकच्या नातेवाईकांनाही कळविले. काही वेळाने आपली आई ही तालुका पोलीस स्टेशनच्या मागील खदानीत पडली असल्याचे समजल्याने सर्वांनी त्या दिशेने धाव घेतली. दरम्यान, त्या परिसरातील एका वॉचमनने खदानात उतरून तिला सुखरुपपणे बाहेर काढले. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला या घटनेची रितसर नोंद करण्यात आली व किरकोळ जखमी महिलेवर दादावाडी परिसरातील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला घरी आणण्यात आले आहे.
या घटनेसंदर्भात जयश्री पाटील यांचा पुतण्या सचिन पाटील यांच्याशी ‘साईमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मावशीच्या अंगात येत असल्यामुळे त्या अवस्थेत ती खदानाकडे गेली व पाय घसरून पडली असावी. आत्महत्या करण्याचा प्रयत्न वगैरे असा प्रकार नाही, अशीही त्यांनी स्पष्टोक्ती केली. दरम्यान, जयश्री पाटील हिने कौटुंबिक वादातून आज सकाळी खदानीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here