जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यात ‘कोवीशिल्ड’ लसीचा तुटवडा असल्याचे चित्र दोन दिवसांपासून समोर आले. प्रशासनाने तातडीने पाठपुरावा केल्याने आता लसीकरणासाठी ३५ हजार डोस उद्या शनिवारपर्यंत उपलब्ध होणार आहेत.जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला बुधवारी लसीअभावी ब्रेक मिळाला. जिल्ह्यातील १३३पैकी १७ केंद्र बंद पडले. पाठोपाठ गुरुवारी आणखी काही केंद्रांत लस
संपल्याने केवळ ४६ केंद्रावरच लसीकरण झाले. उरलेल्या साठ्यातून शुक्रवारी ३७ केंद्रावरच लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गुरुवारी ३ हजार २३२ जणांनी लसीचा पहिला तर ४२५ जणांनी दुसरा डोस घेतला. आतापर्यंत १ लाख ७१ हजार ६७६ लाभार्थ्यांनी पहिला तर १९ हजार ७६७ जणांनी दुसरा डोस अशा एकूण १ लाख ९१ हजार ४४३ जणांनी लस घेतली आहे. काही केंद्रांवर लसीचा साठा संपला असला तरी नवीन ३५ हजार डोस शनिवारपर्यंत मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
लिक्विड ओटूचा पुरवठा घटल्याने यंत्रणा अलर्ट
जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांना लागणार्या कृत्रिम ऑक्सिजनची मागणीही वाढली असताना पुरवठा मात्र घटल्याने यंत्रणा अलर्ट झाली. कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल तेराशेच्या घरात आहे. यातील बहुतांश गंभीर रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आहेत. त्यांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. जीएमसीला दिवसाला सुमारे ८ मेट्रीक टन कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता भासते. त्यासाठी उभारलेल्या ऑक्सिजन टँकमध्ये दर दोन दिवसातून २० किलो लिटर लिक्विड गॅस टाकण्यात येतो मात्र, चार दिवसांपासून उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनात घट झाल्याने पुरवठा घटला आहे. जिल्ह्याला होणारा पुरवठा दोघातिघांमध्ये वितरीत होत आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ऑक्सिजन सिलिंडर भरुन देणार्या गॅस कंपन्यांमध्ये त्याचे वाटप करण्यात येत आहे.
शहरात नवे २९९ रुग्ण
जळगाव जिल्ह्यात सर्वाधित बाधितांची संख्या ही जळगाव शहरात आढळून येत आहे.प्रशासनाने निर्बंध लावले असले तरी नागरिकांची बेपर्वाही अजूनही सुरूच आहे. परिणामी गुरुवारी शहरात २९९ कोरोना बाधित रुग्ण समोर आले. तर दुसरीकडे मृत्यूचे सत्र देखील सुरु असून चोवीस तासात चार बाधितांचा मृत्यू झाला. यात ५५ व ८० वर्षीय पुरुष तर ५० व ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दिवसभरात २६५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. गुरुवारी आरटीपीसीआर चाचणीद्वारे १६२ तर रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे १३७ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. सध्या शहरात २४०४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.