जळगाव ः प्रतिनिधी
शहरात कोविड केअर सेंटरमधील रूग्ण संख्या नगण्य आहे. त्यामुळे प्रशासकीय व आर्थिकदृष्ट्या पाच ते सात रूग्णांसाठी कोविड सेंटर सुरू ठेवणे अडचणीचे आहे.अशा परिस्थितीत मनपाचे कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे मात्र रूग्ण संख्या वाढल्यास पुन्हा सेंटर सुरू करण्याची तयारी असल्याचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील कोरोना बाधितांचा आकडा हळूहळू पंधरा हजाराकडे सरकत आहे.एकूण बाधितांच्या तुलनेत बरे होणार्या रूग्णांचे प्रमाण देखिल भरपुर आहे.सध्या शहरात १३ हजार पॉझिटिव्ह तर साडे बारा हजार रूग्ण बरे झाले आहेत.अजुनही शहरातील २३२ रूग्णांवर उपचार केले जात आहेत. यात सात ते आठ रूग्ण हे किरकोळ लक्षणे असलेली आहेत. त्यामुळे या रूग्णांवर महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करणे प्रशासकिय तसेच आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे शासकीय महाविद्यालय व जिल्हा रूग्णालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून रूग्ण हलवण्यात आले असून पालिकेचे कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. असे आयुक्तांनी सांगीतले.