चोपडा : तालुका प्रतिनिधी
देशासह जगभरात कोरोना या आजाराच्या संसर्गजन्य आपत्कालीन परिस्थितीत गेल्या मार्च महिन्यापासून महाराष्ट्र प्रशासन कार्यतत्परतेने प्रयत्न करीत आहे. त्यातच लॉकडाऊन च्या काळात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असतांना अवैध धंदे मात्र जोरात सुरू आहेत. अवैध पध्दतीने जमाव करून सुरू असलेले जुगार, झन्ना- मन्ना, देशी – विदेशी दारू विक्री, कत्तलीच्या उद्देशाने गौ तस्करी सारखे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.
तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंद्याचा जोर चांगलाच वाढलेला दिसतोय शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून देखील मोठ्या प्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत आणि त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत.राजकीय वरद हस्ताने सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
दरम्यान तालुक्यात देशी, विदेशी, हातभट्टी दारूची दुकाने, सट्याच्या पेढ्या चोवीस तास सुरू आहेत आणि हे सर्व शासकीय नियमांना धाब्यावर बसवून सुरू आहे. शहारा सह तालुक्यातील गावांमध्ये अवैधरित्या सार्वजनिक ठिकाणी देशी , विदेशी,गावठी दारूची विक्री होत असताना अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत आहे.
तसेच अक्षय तृतीयेचा काळ असल्याने विविध ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू आहेत.यामुळे च तालुक्यात भुरट्या चोर्याचे प्रमाण वाढले आहे.
शहरात व तालुक्यात अकरा वाजेनंतर सर्व व्यवहार बंद होतात मात्र अवैध धंदे वाल्यांना या वेळेनंतर तेजी येते शहरात दवाखाने व मेडिकल वगळता जवळपास सर्वच व्यवहार बंद ठेऊन बिचारे व्यापारी सहभाग नोंदवतात तर असे असतांना जुगार, मटका , दारू हे व्यवसाय चोरी छुपे जोरात चालतात.सरकारचे नियम व कायदे फक्त कायदेशीर व्यवसायांनाच लागू पडतात का?अवैद्य व्यवसाय अगोदरच बेकायदेशीर असतात त्यामुळे कायदे पाळण्याचे कोणतेही बंधन त्यांच्यावर असल्याचे कारण नाही असा त्यांचा समज झाला आहे का?लॉक डाऊन नसताना कॉलेज रस्त्यावर विद्यार्थी दिसत होते तिथे आता दारुडे झिगताना दिसतात.
लॉकडाऊन काळातील संचारबंदीचा फायदा घेत तालुक्यातील अवैध धंदे जोरात सुरू असून तालुका प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग डोळेझाक करत असल्याचे सवाल जनतेतून होत आहे. प्रशासनाकडूनच अभय मिळत असल्याने अवैध धंदे जोरात चालू आहेत या धंदे वाल्यांना प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागात तर खुलेआम अकरा वाजे नंतरही व कधीही दारू मिळत असल्याने तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे.संसार उध्वस्त होत आहे. प्रशासनातील अधिकार्यांनी धृतराष्ट्र ची भूमिका सोडून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.प्रशासन मोठ्या प्रमाणात कारवाई करत नाही म्हणून बरेच नवीन व्यावसायिक दारू विक्रीच्या व्यवसायात उतरले असल्याचे दिसून येते.त्यामुळे लॉकडाऊन व कर्फ्यु केवळ एक नंबर धंद्यांना आहे.दोन नंबर धंदे मात्र जिवनावश्यक आहे काय? अशी लोकांमध्ये कुजबुज चालू आहे.