कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची तपासणी करा

0
13

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करावी, त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तींला कोरोना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज दिले.

जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, सहायक आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकरी अरुण आनंदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यो. कों. बेंडकुळे आदी उपस्थित होते.

आयुक्त श्री. गमे म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी गाफील न राहता बाधित आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करावी. बाधित रुग्ण ज्या भागात आढळेल तो भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, त्याचबरोबर भविष्यातील धोके लक्षात घेता जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन जिल्हा ऑकि्सजन निर्मितीत स्वयंपूर्ण होईल यावर भर द्यावा. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस प्रभावी असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीला पहिला डोस लवकरात लवकर देण्यासाठी कृती आराखडा तयार करुन तसे नियोजन आरोगय विभागाने करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या प्रवासाची हिस्ट्री लक्षात घेऊन बाहेर गावावरुन रेल्वे अथवा एसटी ने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करावी, बाधित आढळणाऱ्या रुग्णांचे आयसोलेशन करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.

आगामी सण, उत्सव तसेच शाळा, महाविद्यालये व बाजारपेठा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घेण्यात येत असलेली दक्षता व करण्यात येत असलेली कार्यवाही तसेच लसीची उपलब्धता व लसीकरणाची परिस्थिती याबाबतची माहिती जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी यावेळी दिली. पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या लसीकरणाबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी दिली. ग्रामीण भागातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आशिया यांनी तर जळगाव शहरातील परिस्थितीची माहिती आयुक्त श्री. कुलकर्णी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here