जळगाव ः प्रतिनिधी
कोरोनाने अत्यवस्थ असलेल्या रुग्णांसाठी नाममात्र दरात रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचा उपक्रम राबवण्यात येतो आहे. जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत ‘सेवारथ’ नावाने पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.
जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णांची संख्या शेकडोच्या संख्येने वाढली. काही गंभीर रुग्णही समोर येत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना हॉस्पिटलला दाखल करण्याची वेळ आली आहे. काही रुग्णांना वेळप्रसंगी सिटीस्कॅन तपासणी करण्यासाठी न्यावे लागते. नातेवाईकांना संसर्ग होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते. बर्याच वेळा रुग्णांना ऑक्सिजन लावून तपासणी करावी लागते. या पार्श्वभूमीवर सेवारथ परिवाराच्या वनीने कोरोना तसेच नॉन कोवीड रुग्णांसाठी अल्पदरात ऑक्सिजन रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे.
शहरासह तालुक्यातील तसेच इतर तालुक्यांतील रुग्णांना या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न आहे. क्रिटीकल परिस्थिती असलेल्या रुग्णांना मुंबई, पुणे येथे हलवण्यासाठी व्हेंटिलेटर रुग्णवाहिकादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.१५ दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे.गुरुवारी त्याचे लोकार्पण करण्यात आले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, नीलिमा सेठिया, कंवरलाल संघवी, दीपक चौधरी, सागर दुसाने, कवी कासार, महेश पाटील, दिलीप गांधी आदी उपस्थित होते.