कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ‘दहशत’ कमी झाल्याचे चित्र

0
13

जळगाव ः प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे अनुभव येत असले आणि त्याची भीती लसीकरण केंद्रांवरील गर्दीतून जाणवत असली तरी गेल्या वर्षभरात या आजाराची ‘दहशत’ मात्र पुष्कळशी कमी झाल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. त्यातून कोरोना मृतांच्या नातलगांचे वर्तन बदलले असून ते धोकादायक असले तरी माणुसकी परतत असल्याचीच अनुभूती देणारे आहे. अर्थात, हा बदल टिपलाय नेरी नाका स्मशानातील सहायकाने.
मागच्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाची साथ आली तेव्हा मृतांच्या नातलगांमध्ये या साथीची प्रचंड दहशत होती. त्यामुळे नेरी नाका स्मशानभूमीत कोरोना संसर्ग झालेले मृतदेह येत होते तेव्हा त्यांचे नातलग १०० मीटर दुरूनच अंत्यसंस्कार पाहात होते. क्वचित एखादा नातलग मृताचा चेहरा पाहण्याची इच्छा ठेवायचा. मृतदेहावर दाहसंस्कार झाल्यानंतरही अस्थी नेण्यासाठी नातलग येत नसत. त्यामुळे अनेक दिवस अस्थिकलश स्मशानातच पडून राहत होते. माणूस नातेही विसरला अशा भावनेतून स्मशानातील कर्मचारी त्याकडे पाहत होते.
आता मात्र नातलगांच्या मनात ती दहशत दिसत नाही. भीत भीत का असेना, नातलग मृतदेहाजवळ येतात, काही तर नाही म्हटले तरी चेहर्‍यावरून हात फिरवतात, असे निरीक्षण नेरी नाका स्मशानातील सहायकाने नोंदवले आहे. हे त्यांच्यासाठी आणि इतरांसाठीही धोकादायक असले तरी त्यातून माणुसकी परतत असल्याची भावना या वातावरणात २४ तास राहणार्‍या कर्मचार्‍यांकडून व्यक्त होत आहे.
दोन दिवसांत सात ओटे तयार
अंत्यसंस्कारासाठी ओटे कमी पडत असल्याने महापालिकेने लोकसहभागातून सात ओट्यांची निर्मिती नेरी नाका स्मशानभूमीत केली आहे. दोन दिवसात उभारण्यात आलेले ओट्यांवर गुरुवारपासून अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता जागेअभावी एकाही मृतदेहाची हेळसांड होणार नाही.
चिता शांत होताच निरोप
सध्या नेरी नाका स्मशानात जागेची मोठीच टंचाई जाणवते आहे. गुरुवारपासून नव्या सात ओट्यांवरही शव दहन होणार असल्यामुळे परिस्थिती थोडी सुधारेल. मात्र, तरीही ओटे उपलब्ध व्हावेत म्हणून चिता शांत होताच मृताच्या नातलगांना अस्थी नेण्यासाठी बोलावले जाते आहे आणि नातलगही त्या अस्थी घेऊन जात आहेत, असेही या कर्मचार्‍याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here