जळगाव : प्रतिनिधी
‘चीड येतेय ना या खड्ड्यांची’ म्हणत दोन वेळा विधानसभा जिंकणार्या आणि महापालिकेवर सत्ता मिळवणार्या भाजपने शहर पूर्णपणे खड्ड्यात घातल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. राष्ट्रवादीने काल खड्ड्याला हार अर्पण करून,केक कापत खड्ड्यांचा दुसरा वाढदिवस साजरा केला.
आमदार राजूमामा भोळे यांनी खड्ड्यांच्या नावे शहरात दोन वेळा आमदारकी मिळवली. तोच कित्ता गिरवून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एक वर्षाचे आश्वासन देऊन दोन वर्षांपूर्वी महापालिकेत सत्ता मिळवली.तब्बल दोन वर्षे होऊनदेखील शहरातील स्थिती सुधारण्याऐवजी अधिक खराब झाली आहे.या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काल शहरात खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करीत मनपातील सत्ताधारी भाजपाविषयी अशीही गांधीगिरी केली.
केक कापून आंदोलन
अजिंठा चौफुली परिसरातील खड्ड्यात केक कापण्यात आला. तसेच हार घालून खड्ड्याची पूजा करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे साहिल पटेल, अशोक लाडवंजारी, कैसर काकर, ममता तडवी, पंकज नाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.