केंद्राने आयातशुल्क वाढवल्याने भडकले खाद्यतेलाचे भाव

0
53

जळगाव ः प्रतिनिधी
दैनंदिन जीवनात स्वयंपाकासाठी गरीबापासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांसाठी महत्त्वाच्या अशा खाद्यतेलाचे भडकलेले दर हा सध्या घराघरातील चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, हे दर वाढले म्हणून शेतकर्‍यांना दोन पैसे अधिक मिळत आहेत किंवा व्यापारी नफेखोरी करीत आहे,असे नाही तर या महागाईचा भडका केंद्र सरकारने भरमसाठ वाढविलेल्या आयात शुल्कामुळे उडाला असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.व्यापारी वर्गाकडूनही आता यासंदर्भात आवाज उठू लागला लागला आहे. तेल भाव वाढीमुळे जनता बेजार झाले असून आता व्यापारीही याबाबत आश्चर्य व्यक्त करीत आहे.
भारत मुळातच खाद्यतेलाचा आयात करणारा देश असतानाही दिवाळीत खाद्यतेलाच्या आयातीवर केंद्र सरकारकडून ४ टक्के आकारले जाणारे आयातशुल्क आता थेट २३ टक्के केले गेले आहे, तर जे देश यापूर्वी निर्यात अनुदान देत होते, त्यांनीही ५ टक्के निर्यात कर आकारणे सुरू केले आहेत.त्यामुळे तेलाच्या महागाईला केंद्र शासनाची करवाढ जबाबदार असल्याचे समोर येत आहे.
डाळी आणि तेलबियांच्या बाबतीत भारत आजही अनेक देशांवर निर्भर आहे.आजही डाळी, खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते यात, युक्रेनमधुन सूर्यफुलाचे तर मलेशियामधुन सोयाबिन आणि पामतेलाची आयात होत असते. शेंगदाणा तेलाची व सोयाबिन तेलाची काही अंशी देशांतर्गत गरज भागत असते. असे असतांना विदेशातून आयात होणार्‍या या जीवनावश्यक वस्तूंवर कर वाढवले गेले की, त्याचा परीणाम थेट स्वयंपाकघरापर्यंत पडत असतो.
लॉकडाऊनच्या काळात एका बाजुला ही आयात प्रभावित झालेली असतानाही दिवाळीच्या काळात ४ ते ६ टक्के आयातशुल्क असलेल्या या तेलांवरील शुल्क वाढवून थेट २३ टक्के केले गेले आहे. त्यामुळे तेलाचे दर अजून भडकणार असल्याची चिंता आता व्यापार्‍यांनाही सतावू लागली आहे. यापुर्वी कधीच पहायला न मिळालेली पामतेलाचे प्रचंड दरवाढ देखिल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कधी नव्हे ते पामतेलाचे दर १२० ते १२५ रुपयांवर पोहोचले आहे तर शेंगदाणा तेलाचे दर १७० रुपये लिटरपर्यंत पोहोचले आहे.या भाववाढीमुळे गोरगरिबाला चटणीवर तेल टाकून पोट भरणेही कठीण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here