एरंडोल ः प्रतिनिधी
तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह काल पळासदळ शिवारात संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यांचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा नोदविण्याची प्रक्रिया एरंडोल पोलिस स्टेशनला सुरू आहे.
राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह पळासदळ शिवारात काल सकाळी आढळून आला होता.परवा सायंकाळी ते एका कार्यक्रमात गेले होते परंतु ते तेथून रात्री उशिरा घरी परत आले होते मात्र मध्यरात्री कुणाचातरी फोन आल्याने ते पुन्हा घराबाहेर पडले होते. ते सकाळपर्यंत घरी परत आले नव्हते. परंतु सकाळी दहा वाजता त्यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून आला होता.
त्यांचा मृत्यू घातापाताने झाल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कुंझरकर यांचा मृतदेह हा संशयास्पद स्थितीत आढळून आला असल्याने त्यांचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात एरंडोल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली.