जळगाव ः प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन व स्थानिक पोलिस प्रशंसानाने सयुंक्त रित्या कारवाई करीत एरंडोल तालुक्यातील कासोदा ग्रामपंचायत हद्दीतील धान्यमार्केट समोरील गोपाल नगर बांभोरी शिवारातील पत्र्याच्या शेड असलेल्या गोदामात साठवणूक करून ठेवलेला तब्बल ९ लाख १५ हजार २००. रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत गोदामावर जाऊन तपासणी केली व या ठिकाणी हजर असलेल्या व्यक्तीस विचारले असता , सदर व्यक्तीने दुकान व गोदाम आमचेच असल्याचे सांगितले, गोदामात गुटखा साठविला जात असल्याची माहिती जळगाव येथील अन्न व औषधी विभाग यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गोदामातून विमल पान मसाल्याचे ४१६० कंपनी पॅक पाकिटे प्रत्येकी किंमत १८७ अशी असून एकुण किंमत ७ लाख ७७ हजार ९२० रुपयेचा व विमल- १ तंबाखु एकूण ४१६० पॅक पाकिटे प्रत्येकी असा एकूण किंमत १ लाख ३७ हजार २८० रुपये चा साठा आढळून आला.
तपासणी अंती अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांच्या फिर्यादीवरून सपोनि रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, दुकान मालक निलेश मधुकर चिंचोले याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अन्न व औषध प्रशासन यांच्यासह कासोदा पो.स्टे.चे सपोनि रविंद्र जाधव,पीएसआय नरेश ठाकरे, पो.कॉ.जितेश पाटील , पो.कॉ.समाधान तोंडे ,पो.कॉ.इम्रान खान यांच्या पथकाने ही कार्यवाही केली असून पुढील तपास सपोनि रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नरेश ठाकरे हे करीत आहे.कासोदा पोलिसांचे परिसरातून कौतुक केले जात असून गावात अनेक व्यापारी गुटखा विक्री करतात परंतु एकाच दुकानावर दुसर्यांदा छापा का टाकला असावा यामुळे गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात येथे गुटखा विक्री होत असल्याने गुटखा माफियांचे जाळे अधिक वाढत असल्याचे दिसते. ही परिस्थिती चिंताजनक असून कासोद्याला गुटखा व तंबाकुमुक्त करण्यासाठी प्रथम अशा माफियांचा शोध घेणे गरजेचे ठरले आहे तर कासोद्यात गुटका किंग वाढल्याने युवा पिढी व्यसनाधीन झाली असून, ही चिंताजनक बाब असल्याचे दिसून येते.