जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यात निदान झालेल्या कोरोना रुग्णांपैकी ७७ टक्के रुग्णांना कोणत्याच प्रकारची लक्षणे नाहीत परंतु त्यांचा मुक्तसंचार हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरतो आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जागरुकता हवी.
जिल्ह्यात दररोज हजारो नागरिकांच्या आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत.निदान झालेल्या रुग्णांत सर्वाधिक रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. आयसीएमआरने याबाबत अनेक वेळेस माहिती दिली आहे मात्र तरीही रुग्णांचा बिनधास्त वावर व टेस्ट करण्यास टाळाटाळ हे रुग्णसंख्या वाढण्याचे कारण ठरत आहे.
सध्या जिल्ह्यात ११ हजार ५७९ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यात ८ हजार ८८७ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. दरम्यान, लक्षणे नसलेल्या मात्र पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला सुरवातीचे सात दिवस कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याने या व्यक्तीला ओळखणे कठीण होते मात्र जी व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आली आहे मात्र तिला कोणताही त्रास होत नाही अशा व्यक्तीने तत्काळ चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
असिम्प्टोमॅटिक रुग्ण
कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होऊन देखील संबंधीत रुग्णाला ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत नसेल तर या रुग्णांना वैद्यकीय भाषेत असिम्प्टोमॅटिक रुग्ण म्हणून ओळखले जाते. या रुग्णांचे निदान चाचणी झाल्याशिवाय कळत नाही. दरम्यान या रुग्णांनी स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे. जर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले असतील तर स्वतःहून चाचणी करून निदान करून घ्यावे. हे निदान लवकर न झाल्यास त्यांच्यापासून शंभरहून अधिक लोकांना कोरोना संसर्गाची लागण होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते आहे.
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण – ११७०२, लक्षणे नसलेले रुग्ण- ९०२६, लक्षणे असलेले रुग्ण – २६७६, आयसीयूमधील रुग्ण- ५३२, कृत्रिम प्राणवायूचे रुग्ण – १३९४