कांताई नेत्रालयात १५ हजारावर शस्त्रक्रिया पूर्ण; पाचवा वर्धापदिन उत्साहात साजरा

0
17

जळगाव ः प्रतिनिधी
येथील भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि पुणे अंधजन मंडळ यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू असलेल्या ’कांताई नेत्रालयाने’ पाच वर्षांत १५ हजार नेत्रशस्त्रक्रियांचा टप्पा पार केला आहे. अलीकडेच काळात नवजात अर्भकांचे दृष्टीदोष दूर करण्यासाठी आधुनिक पद्धतीने निदान व उपचार सेवेची सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती नेत्रालयाच्या मेडिकल डायरेक्टर व नेत्रविशारद डॉ. भावना अतुल जैन यांनी दिली.
कांताई नेत्रालयाचा पाचवा वर्धापनदिन दि.१९ रोजी साजरा झाला. जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी पत्नी कांताबाई यांच्या स्मरणार्थ दि. १९ जानेवारी २०१६ रोजी नेत्रालयाचा प्रारंभ केला होता.
डॉ. भावना जैन यांनी नेत्रालयातर्फे गेल्या पाच वर्षांत दिलेल्या नेत्र उपचार व शस्त्रक्रियांची आकडेवारी दिली. या नेत्रालयात गेल्या पाच वर्षांत १ लाख ८० हजारांवर नेत्र रुग्णांची तपासणी करून उपचारासह इतर आवश्यक सेवा दिली आहे. यात लहान मुलांच्या नेत्रातील जन्मजात मोतीबिंदू व तिरळेपणाचा दोष दूर करण्याच्या ११४, कॉर्निया (बुब्बूळ) दोष निवारणाच्या ४८२, काचबिंदूच्या ५० हुन अधिक , रेटीना (पडद्याशी संबंधित) २७० अशा अवघड व जोखिमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
गेल्या पाच वर्षांत कांताई नेत्रालयाने खान्देशातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही नेत्र तपासणी आणि उपचारासह यशस्वी शस्त्रक्रियांच्या संदर्भात उच्चस्तर गुणवत्ता आणि रुग्णसंख्येचा माईलस्टोन रोवला आहे. कांताई नेत्रालयाने जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा, अहमदनगर व जालना जिल्ह्यात नेत्र शिबिरे घेतली आहेत.
अशी सर्व मिळून १,२०० वर शिबिरे झाली आहेत. कांताई नेत्रालयात नेत्र विकारांशी संबंधित मोतीबिंदू, काचबिंदू, रेटीना, कार्निया, लहान मुलातील दृष्टी दोष या विकारांच्या निदान व उपचाराकरिता लागणारी सर्व अद्ययावत उपकरणे व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रुग्णांना योग्य नंबरचे चष्मे, औषधी सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जन्मजात बालकात रेटीनोपैथीशी संबंधित काही दोष उद्भवला तर त्यावरही शस्त्रक्रिया व लेझर सेवा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
कांताई नेत्रालयाद्वारे आतापर्यंत ४ ठिकाणी व्हिजन सेंटरची सुरूवात करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यात चोपडा, पाचोरा, बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा व जालना जिल्ह्यात परतूर येथे पूर्ण वेळ नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध आहे, असे सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here