जळगाव, प्रतिनिधी । कर्मचारी संघटनांच्या आक्रमक दबावानंतर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांचा पदभार काढून घेतल्यानंतर दीड महिन्यातच त्यांच्याकडे हा पदभार पुन्हा सोपविण्यात आला आहे.
शुक्रवारी प्रभारी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी हा पदभार त्यांच्याकडे पुन्हा सुपूर्द केला. तत्कालीन प्रभारी कुलसचिव प्रा. ए. बी. चौधरी यांनी राजीनामा दिल्याने हा बदल करण्यात आला आहे. डॉ. भादलीकर यांनी सायंकाळी पदभार स्वीकारला.
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती शिक्षण संचालकांकडे पाठवल्याच्या मुद्यावरून कर्मचारी संघटनांनी डॉ. भादलीकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलने सुरू केली होती. तीन ते चार दिवस कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. याची दखल घेत डॉ. वायुनंदन यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार प्रा. ए. बी. चौधरी यांचेकडे सोपवला होता.
मात्र तब्बल दीड महिनाभरातच चौधरी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले. यामुळे या पदावर पुन्हा भादलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भादलीकर हे उपकुलसचिव (विधी व माहिती अधिकार) म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी मार्च ते जुलै या कालावधीत त्यांनी प्रभारी कुलसचिव म्हणून काम केले होते. पदभार स्वीकारतेवेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य राजू फालक, दीपक पाटील, प्रा. एस. आर. चौधरी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यापीठ प्रशासनाने आपण केलेल्या कामाच्या बळावर पुन्हा या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन सर्व घटकातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी सांगितले.