जळगाव ः प्रतिनिधी
महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक यांची चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अत्यंत वाईट पद्धतीने अवहेलना केल्यामुळे महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येत घटनेचा निषेध केला. या प्रकरणी कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत वीज बिल वसुलीसह सर्व प्रकारचे काम बंद ठेवण्याचा इशारा अभियंत्यांसह सर्व संघटनांच्या कृती समितीने दिला.
वीज मंडळाच्या कार्यालयात घुसून वरिष्ठ अधिकार्यांना अतिशय गलिच्छ पद्धतीने वागणूक देत शिवीगाळ, मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी परिमंडळ कार्यालयात घडली. वीज कर्मचारी हे शासनाच्या निर्देशानुसार वीज वसुलीचे काम करीत आहेत मात्र लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारे अधिकार्यांना मारहाण होणे हा निंदनीय प्रकार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी सांगितले. या घटनेनंतर सर्व कर्मचार्यांनी औद्योगिक वसाहत पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली. शंभरावर अभियंता, ऑपरेटर, प्रशासकीय कर्मचारी पोलिस स्टेशनच्या बाहेर जमले होते.
वसुलीचे काम करीत असताना कर्मचारी, अभियंत्यासह वरिष्ठांना मारहाणीच्या घटना वाढत आहे. लोकप्रतिनिधींकडून हे कृत्य योग्य नसल्याने संबधितांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय दैनंदिन काम आणि वसुलीचे काम करण्यात येणार नसल्याचे सबआर्डीनेड इंजिनीअर्स संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, सहसचिव कुंदन भंगाळे यांच्यासह कृती समितीच्या पुदाधिकार्यांनी सांगितले.