जळगाव ः प्रतिनिधी
स्वर्गीय वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानच्या १९व्या बालगंधर्व संगीत मंहोत्सवाच्या तिसर्या दिवशी काल सायंकाळी ५ वाजता तीन सत्रात कार्यक्रम घेण्यात आले.पहिल्या सत्राला भुवनेश्वर येथील सुश्री मोहंती यांच्या ओडिसी नृत्याने सुरुवात करण्यात आली. त्यांनी ब्रह्मा, विष्णू व महेश, सूर्यास्टकम व मुद्राभिनयातून कृष्णलीला दाखवत रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर गोटीपुवा नृत्यातून स्त्री वेषातील कलाकारांनी रसिकांना खिळवून ठेवण्यात यश मिळवले. तर तिसर्या सत्रात ‘आम्ही दुनियेचे राजे’ या सांगीतिक कार्यक्रमात १९१० ते १९६० दरम्यानचा काळ जागवण्यात कलाकारांना यश आले.
या महोत्सवात काल छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता तिसर्या दिवसाच्या प्रथम सत्राला सुश्री मोहंती यांच्या ओडिसी नृत्याने सुरुवात करण्यात आली. तर द्वितीय सत्रात गोटीपुवा समूह नृत्य सादर झाले. कार्यक्रमाची सांगता ‘आम्ही दुनियेचे राजे’ या सांगीतिक कार्यक्रमाने करण्यात आली. यात १९१० ते १९६०दरम्यानच्या सुवर्णकाळातील नव्याने संगीतबद्ध केलेला नाट्यानुभव कलाकारांनी सादर केला. या तिन्ही कार्यक्रमांना रसिकांनी दाद दिल्याने कार्यक्रमात रंगत आली होती.
ओडिसी नृत्यात सुश्री मोहंती (भुवनेश्वर) यांना अमन रॉय बिनायक जिना, मिठू दास, प्रकाश साओ, ज्योती दास, सूर्यकांत सुबुधी या कलाकारांनी साथ दिली. तर मृदंगावर बटकृष्णदास, बासरी कबिराज प्रसाद, राजेशकुमार मंजिराम, प्रिया पलई यांनी साथसांगत केली.या वेळी शरदचंद्र छापेकर, रत्नाकर पाटील, डॉ. विवेकानंद कुलकर्णी, पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, भरत अमळकर, विठ्ठल रंगम, आर. बी. पाटील, बी. एम. भट, दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर, आशा भोसले आदी उपस्थित होते. दीप्ती भागवत यांनी सूत्रसंचालन केले.
जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
‘आम्ही दुनियेचे राजे’ या सांगीतिक कार्यक्रमात १९१० ते १९६० या ५० वर्षांतील अनेक कलाकारांच्या आठवणी ताज्या करण्यात कलाकार यशस्वी ठरले. यात गाण्यांबरोबर त्या काळातील कलाकारांच्या आठवणी ऐकण्यात प्रेक्षक तल्लीन झाले होते. यात भास्कर बुवा, बालगंधर्व, जितेंद्र अभिषेकी, व्ही. शांताराम, ग. दि. माडगूळकर, बाळ चित्रे, राम कदम, भा. रा. तांबे, सुलोचनाबाई, श्रीनिवास खळे, वसंत देसाई, वसंत पवार, भा. रा. तांबे, सुधीर फडके, मंगेश पाडगावकर, जगदीश खेबूडकर आदींचे दाखले कार्यक्रमात देण्यात आले.
‘आम्ही दुनियेचे राजे’ नाट्यानुभव
या सांगीतिक कार्यक्रमाची सुरुवात ‘विश्वाचे हे आमुचे वैभव, राजे आम्ही दुनियेचे’ या गाण्याने करण्यात आली. त्यानंतर १९१० ते १९६० या काळातील कलाकारांच्या आठवणी, घटना सांगून त्यांनी निर्मिलेली गाणी गाण्यात आली. यात ‘रिमझिम पाऊस पडे’, ‘सप्तपदी ही रोज चालते’, ‘घनश्याम सुंदरा’, ‘या इथे उगवता सूर्य कुणाला दिसे ना’, ‘घन बरसत-बरसत आले’, ‘देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी’, ‘तुमच्यासाठी घातली मी वेणी फणी’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ या लावण्यांपासून ते ‘सांगा मुकुंद कुणी पाहिला’ आदींपर्यंतची गाणी नवीन ढंगात गाण्यात कलाकार यशस्वी झाले. कार्यक्रमात जयदीप वैद्य, मुक्ता जोशी, आशुतोष मुगळे, राजेश्वर पवार (गायक) केतन पवार (तालवाद्य वादक), सौमित्र कुलकर्णी यांनी रंगत आणली. तर गौतमी देशपांडे (सही रे सही फेम) व अभिजित खांडेकर (माझ्या नवर्याची बायको फेम) यांच्या बहारदार अँकरिंगने कार्यक्रमात हास्याबरोबरच जुन्या काळातील आठवणी जागवण्यात ते यशस्वी झाले.
गोटीपुवा नृत्याने आणली रंगत
स्त्री वेषातील कलाकारांनी गोटीपुवा नृत्य सादर केले. त्यांच्या नृत्यात थरारकता तर होतीच त्याचबरोबर मुखाभिनयासह पदलालित्यही होते. त्यांनी आपल्या नृत्यातून मानवी थर रचत नृत्यातून थरार आणला. या गोटीपुवा नृत्याला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली.