जळगाव : प्रतिनिधी
कोरोनाच्या कहराने रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी कृत्रिम प्राणवायुची प्रचंड मागणी वाढू लागली आहे. या तुलनेत पुरवठा होत नाही तसेच ऑक्सिजन सिलेंडरचे दर चार ते पाच पट वाढल्याने खाजगी कोविड सेंटर अडचणीत आल्याचे चित्र उभे राहिले आहे. असे झाल्यास हे खाजगी कोविड सेंटर बंद होवून कोरोना विरुध्दच्या लढाईला अंतिम घटीका मोजाव्या लागतील. या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून ज्या पध्दतीने कोविड रुग्णांच्या उपचाराचे दर ठरविले गेले आहे, त्याच पध्दतीने ऑक्सिजन पुरवठा करणार्या कंपन्यांनाही दरपत्रक ठरविणे गरजेचे झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने कहर केला आहे. यावेळेस कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात चार ते पाच ठिकाणी ऑक्सिजन रिफिलींग प्लांट आहे. या प्लांटला ऑक्सिजन लिक्वीडचा पुरवठा कमी प्रमाणात येत असल्याने जितका साठा त्यांच्याकडे आहे त्यावर संबंधित रिफिलींग प्लांटधारकांनी ऑक्सिजनच्या सिलेंडरच्या किंमतीमध्ये कमालीची वाढ केली आहे. सुरुवातीला ऑक्सिजन सिलेंडर हे २५० रुपयापर्यंत मिळायचे, आजमितीस त्याचे दर ८०० ते १ हजार रुपयांपर्यंत गेले असल्याचे समजते. यामुळे कोविड रुग्णालयाच्या आर्थिक बजेटमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कोविड रुग्णालयाला शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच काम करावे लागते. मात्र कोविड सेंटरसाठी अत्यावश्यक असलेले ऑक्सिजन सिलेंडरचे दर वाढल्याने आता हे खाजगी कोविड सेंटर अडचणीत सापडले असल्याचे चित्र उभे राहिले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.