मुंबई, वृत्तसंस्था । एसटी संपावर तोडगा निघत नसल्याने आता आझाद मैदानातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा जोर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील २५० आगारांतील एसटी कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आझाद मैदानात यावे आणि संघर्षाचा लढा तीव्र करावा, असे आवाहन फेसबुकच्या माध्यमातून संपकरी कर्मचाऱ्यांनी केले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक आगारांतील एसटी कर्मचारी आझाद मैदानात येतात. ज्यांची घरे या परिसरात आहेत ते येऊन-जाऊन आंदोलनात सहभागी होत आहेत. मैदानात येताना अन्य सहकाऱ्यांसाठी दिवाळीचा फराळ, जेवणाचा डबा घेऊन येतात. तर, मुंबई बाहेरील आगारांतील कर्मचारी मैदानातच वास्तव्यास आहेत.
राज्यातील प्रत्येक आगारातून साधारणपणे शंभर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात यावे. येताना कर्मचाऱ्यांनी पेमेंट स्लीप, आधार कार्ड, मास्क जवळ बाळगावे. तसेच मैदानात राहण्यासाठी चार जोडी कपडे सोबत ठेवावे, असे आवाहन फेसबुकच्या माध्यमातून आझाद मैदानातील कर्मचाऱ्यांनी राज्यातील अन्य संपकरी कर्मचाऱ्यांना केले आहे.
मुंबईतील सेवाभावी संस्था, सर्व धर्मीय ट्रस्टकडून आझाद मैदानात संपकरी कर्मचाऱ्यांना नाष्टा आणि जेवणाची सोय करण्यात येत आहे. मात्र दैनंदिन वापरातील वस्तू म्हणजेच ब्रश, कोलगेट आणि अन्य साहित्य स्वतः घेऊन मुंबईतील आझाद मैदानात या, असे संपकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
‘चलो मुंबई, चलो आझाद मैदान… काय वाटेल ते करून आझाद मैदानावर यायलाच हवे. महामंडळात ९२,७०० कर्मचारी आहेत. यापैकी केवळ ३००० कामगार मैदानात आहेत, हे समीकरण न पटण्यासारखे आहे. ड्युटी रोज करत असता मग चार दिवस आयुष्यासाठी नाही का देऊ शकत? बेस्टच्या ड्युटीसाठी सर्व कर्मचारी आलात, आता स्वतःच्या कुटुंबीयांसाठी पुढे या. अन्यथा सरकार तुमची दखल घेणार नाही’, अशी भावनिक साद फेसबुकच्या माध्यमातून घालण्यात आली आहे.