जळगाव, प्रतिनीधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमबीबीएस शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १७ जणांनी नोंदणी करीत प्रवेश प्रक्रियेसाठी कार्यवाही केली.
राज्य शासनाच्या सीईटी सेलतर्फे मंगळवारी १२५ विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली. या अंतर्गत इच्छुक पात्र उमेदवारांना ७ फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रियेविषयी कार्यवाही करावयाची आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी सकाळपासून विद्यार्थी व पालकांची प्रवेशासाठी धावपळ सुरु होती.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १५० विद्यार्थी क्षमता आहे. त्यात राज्याच्या कोट्यातून १२५ नावे आली आहे. तर केंद्र शासनाच्या सीईटी सेल कडून २३ नावे अद्यापि यायची बाकी होती. विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेच्या कार्यवाहीसाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थी, त्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियेबद्दल समुपदेशन केले जात आहे.