जळगाव ः प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे १४ मार्च रोजी नियोजित राज्य सेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या परीक्षार्थींनी काल दुपारी ३.३० वाजता कोर्ट चौकात महाराष्ट्र शासनाविरुद्ध घोषणाबाजी करून परीक्षा नियोजित तारखेला घेण्याची मागणी करीत दीड तास रास्ता रोको केला.अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी समजूत काढल्यानंतर दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी आंदोलन मागे घेण्यात आले.त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना आंदोलकांच्या प्रतिनिधींनी मागण्यांचे निवेदन दिले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १४ मार्च रोजी राज्य सेवा पूर्वपरीक्षा नियोजित होती. शहरातील १६ उपकेंद्रांवर प्रथम सत्र सकाळी १० ते दुपारी १२ व द्वितीय सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ५ या कालावधीत घेण्यात येणार होती.ही परीक्षा जिल्ह्यातून ६ हजार २६४ परीक्षार्थी देणार होते.या परीक्षेसाठी ४८९ अधिकारी, कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या परीक्षार्थींनी दुपारी ३.३० वाजता कोर्ट चौकात येऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
तर एमपीएससी परीक्षा का नको?
परीक्षार्थी आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे आंदोलनस्थळी आले. हा निर्णय एमपीएससीने घेतलेला आहे. तुमच्या मागण्या शासनाला कळवतो, असे विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी परीक्षार्थींनी रास्ता रोको मागे घेतला. वर्षभर अभ्यास करून आम्ही परीक्षेची तयारी केली. त्यासाठी शहरात राहण्याचा खर्च व वेळ सलग दोन वेळेस परीक्षा पुढे ढकलल्याने वाया गेला आहे. निवडणुका घेतल्याने, नेत्यांच्या सभा घेतल्याने कोरोना पसरत नाही; मग एमपीएससीची परीक्षा घेतल्यानेच कोरोनाचा प्रादुर्भाव होतो का? असे प्रश्न या वेळी परीक्षार्थींनी उपस्थित केले.
ठिय्या मांडून वाहने अडवली
रस्त्यावरच ठिय्या मांडून वाहने अडवली. सलग दुसर्यांदा एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी संतप्त झाले. या वेळी शहर व जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, कर्मचारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी रास्ता रोको न करण्याची विनंती केली मात्र परीक्षार्थी ऐकायला तयार नव्हते. शेवटी आंदोलनस्थळी दंगाकाबू पथकाला पाचारण करण्यात आले.
जिल्हाधिकार्यांना निवेदन
कोविडचे कारण देत महाराष्ट्र शासन स्पर्धा परीक्षा देणार्या सामान्य कुटुंबातील उमेदवारांवर अन्याय करीत आहे. शासनाने आपल्या या दुर्देवी निर्णयाचा पुनर्विचार करावा व कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात.कोविड पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची परीक्षानंतर घेण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगरतर्फे जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.या वेळी अभाविपचे जळगाव महानगर मंत्री आदेश पाटील, पवन भोई, रितेश महाजन, निखिल बिरारी, मयूर माळी, भूषण महाजन आदी उपस्थित होते.