जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीतील ‘डी’ सेक्टरच्या पश्चिमेकडे अक्षय प्लास्टीकच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतील कचर्याला आग लागून आगीने रौद्र रुप धारण केले होते. वेळीच प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत माहिती अशी की, अक्षय प्लास्टीकच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत एमआयडीसीतील कचरा टाकला जातो. या जागेपासून काही अंतरावर शेतीसुध्दा केली जाते. उन्हाळा असल्याने या परिसरातील मोकळ्या जागेत असलेले झाडे व गवत सुकलेले आहे. या कंपनीच्या शेजारीच शर्मा इंजिनिअरींग वर्क्स आहे. या कंपनीच्या पाठीमागील आवारात कंपनीने एका भंगारवाल्याला सदर जागा पोटभाडेकरु म्हणून भाड्याने दिली आहे. सदर भाडेकरु इम्तियाज खान हा आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घरुन कंपनीकडे येत असतांना त्यास कंपनीच्या मागील भागातून मोठ-मोठे धुराचे लोळ दिसून आले. खान यांनी तेथे जावून पाहणी केली असता कंपनीच्या मागील भागात मोठी आग लागली होती. त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत अग्निशमन दलाला माहिती कळविली. अग्निशमन दलाच्या बंबाने वेळीच येत आगीवर नियंत्रण मिळविले.
दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याबाबत समजले नसले तरी या लागलेल्या आगीच्या बाजूने असलेले मोठे भंगारचे गोडावून आगीच्या भक्षस्थानी आले असते तर काय झाले असते? हा विचारच भयंकर आहे. कारण या कंपन्यांच्या बाजूला लागूनच असलेल्या सुमारे तीन केमिकल कंपन्या आहेत. यासुध्दा या आगीच्या विळख्यात सापडल्या असत्या. दरम्यान, आगीचा प्रकार घडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांच्या म्हणण्यानुसार या मोकळ्या जागेत टाकण्यात आलेला कचराच या आगीला जबाबदार असून प्रशासनाने या मोकळ्या जागेत टाकल्या जाणार्या कचरा टाकण्यावर बंदी आणावी, असे चर्चिले जात होते. या आगीबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसा कुठलीही नोंद झाली नव्हती.