जळगाव ः प्रतिनिधी
जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलासंदर्भात ग्रामविकास विभागाने गठीत केलेली चौकशी समिती सध्या जळगावात आली आहे. या प्रकरणातील मुळ तक्रारदार ऍड. विजय भास्कर पाटील यांनी काल जिल्हा परिषदेत या समितीची भेट घेतली. तक्रारीच्या अनुशंगाने पुरक माहितीसाठी त्यांनी समितीच्या अध्यक्षांना निवेदन देवून चर्चा केली.
चौकशी करण्यासाठी ग्रामविकास विभागाने गठीत केलेली समिती दोन दिवसांच्या जळगाव दौर्यावर आलेली आहे. शुक्रवारी ऍड. पाटील यांनी समितीतील अधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच तक्रारीतील मुळ जागेची पाहणी करण्यासाठी जामनेर येथे जाण्याबाबत त्यांनी चौकशी समितीचे अध्यक्ष मनिष सांगळे यांच्याशी चर्चा केली. समितीचे सदस्य सहाय्यक आयुक्त राजन पाटील, सहाय्यक लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, जितेंद्र पाटील उपस्थित होते. चौकशीदरम्यान स्थानिक अधिकार्यांची मदत घेऊ नका. कंत्राटदार खटोड हे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने अधिकार्यांवर दबाव येऊ शकतो,असे ऍड. पाटील यांनी समितीला सांगितले.
अहवालानंतर वाढेल व्याप्ती
या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे. चौकशीशी संबंधित काही तांत्रिक मनुष्यबळ, तज्ञ अधिकार्यांची चौकशी समितीला गरज भासणार आहे. त्यात बांधकाम विभागाशी संबंधित अभियंते, महसुल अधिकारी यांची गरज भासणार आहे. विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केल्यानंतर पुढील आठवड्यात त्यांना हे मनुष्यबळ उपलब्ध होवू शकते.