मुंबई, वृत्तसंस्था । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील कुणबी विद्यार्थ्यांसाठी मुंबईत मुलुंड येथे वसतीगृह उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे सोमवारी (दि. 20) एका विशेष समारंभात सुपुर्द् करण्यात आला. कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी राज्य सरकार बांधील आहे. कुणबी, ओबीसी समाजबांधवांसह विविध समाजघटकांसाठी कार्यरत विकास महामंडळांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून त्यानुसार निधी उपलब्ध केला जात आहे. नवीन घटकांना आरक्षण देत असताना सध्या लागू मूळ आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, याची काळजी सरकार घेईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्यातील कुणबी समाजबांधवांच्या मुलांना मुंबईत शिक्षण घेत असताना निवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईत मुलुंड येथे वसतीगृह उभारण्याची व त्यासाठी पाच कोटींचा निधी राखून ठेवल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघाला मुलुंड येथे कुणबी विद्यार्थी वसतीगृह बांधण्यासाठी पाच कोटींचा निधी देण्याचा शासन निर्णय जुलैमध्येच तातडीने जारी करण्यात आला. त्या पाच कोटींच्या निधीचा धनादेश नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते कुणबी समाजोन्नती संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे सह्याद्री अतिथीगृहात विशेष समारंभात सुपुर्द करण्यात आला. यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, संदिप रायपूरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आदींसह संघाचे पदाधिकारी, सभासद व कुणबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर पुढे चालत राहण्याची आपली परपंरा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, आदरणीय शरद पवार साहेबांपासून उद्धवजी ठाकरे यांच्यापर्यंत राज्याच्या प्रत्येक प्रमुखाने ही परंपरा जपली आहे. विकासाची ही परंपरा यापुढेही कायम राहील. एका समाजाला मदत करताना, त्यांचे हक्क देतांना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेईल. मुलुंड येथे कुणबी समाजोन्नती संघाच्या माध्यमातून उभं राहत असलेलं वसतीगृह हे आधुनिक, आकर्षक, सर्व सुविधायुक्त असावं. त्यांचं बांधकाम दर्जेदार व इमारतीत सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवावी. इमारत पर्यावरणपुरक व शहराच्या सौंदर्यात भर घालणारी असावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांकेडे व्यक्त केली. इमारतीच्या उभारणीत काही अडचणी आल्यास त्या दूर करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिलं.
खासदार सुनील तटकरे यावेळी म्हणाले की, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी मुंबईत वसतीगृह असले पाहिजे, असा विषय उपमुख्यमंत्र्यांकडे उपस्थित केल्यानंतर त्यांनी मागणीची सकारात्मक दखल घेतली व अर्थसंकल्पात त्याची घोषणा केली. यासंदर्भातला शासननिर्णयही तातडीने जारी करण्यात आला. त्या पाच कोटींच्या धनादेशाचे वितरण आज होत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वेगवान कार्यपद्धतीमुळेच हे काम तातडीने मार्गी लागत आहे, असे गौरवोद्गारही खासदार सुनील तटकरे यांनी काढले. मुंबईतील या वसतीगृहाच्या माध्यमातून कुणबी विद्यार्थ्यांना मुंबईत राहण्यांसाठी हक्काची सोय उपलब्ध होणार आहे. वसतीगृहाचा उपयोग करुन समाजातील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतील, जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह विविध जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकीसारख्या शाखांचे उच्च शिक्षण, स्पर्धा परिक्षांची तयारीसाठी समाजोन्नती संघ व शासनातर्फे आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती यावेळी सघांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली तसेच वसतीगृहाच्या उभारणीसाठी तत्परतेने मदत केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.