उपनगरांमध्ये लसीकरण केंद्र वाढवा; पॉझिटिव्ह घरी न आढळल्यास गुन्हा दाखल करा : महापौर महाजन

0
18

जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील लसीकरण केंद्रांवर गैरसोयीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक केंद्रावर लस उपलब्धतेसंदर्भात फलक लावावा. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सावलीसाठी व्यवस्था करावी अशा सूचना करत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी समन्वयकाची नियुक्ती करण्याच्या सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या. या वेळी नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता अधिकार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली.
मनपा कोविड लसीकरण केंद्रांचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी बुधवारी दुपारी वैद्यकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी आदी उपस्थित होते. लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता उपनगरांमध्ये व्यवस्था होणे गरजेचे आहे. पिंप्राळा, जुने जळगाव, हरीविठ्ठल नगरसह इतर परिसरात लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक असल्याचे उपमहापौर पाटील यांनी सांगितले. गृहविलगीकरणात असलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पॉझिटिव्ह आलेले काही रुग्ण कुठे आहेत याचा देखील शोध घेतला जात नसल्याची माहिती आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व रुग्णांनी विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. संबंधित अधिकार्‍यांनी रुग्णांचा शोध घ्यावा आणि जे नियम मोडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
लसीकरण केंद्रावर नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध आहे की नाही याबाबत दर्शनी भागात फलक लावावा, उन्हाळ्याचे दिवस असल्याने सावलीसाठी ग्रीन नेट किंवा मंडप टाकावे, बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, मनुष्यबळ वाढवावे, नियोजन ठेवण्यासाठी आवश्यकता असल्यास प्रत्येक लसीकरण केंद्रावर २ महिला, २ पुरुष सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी नेमण्यात यावे अशा सूचना महापौर महाजन यांनी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here