मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
कोरोना जागतिक महामारी दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उद्या दि.९ शनिवार रोजी सफला एकादशीस मुक्ताबाई मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
दि.९ जानेवारी २०२१ रोजी मार्गशिर्ष सफला एकादशी आहे. बारा महिन्यात महाशिवरात्री यात्रेनंतर सर्वात गर्दीची महावारी असल्याने राज्यातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी हजेरी देतात. नुकताच राज्यात कोरोना महामारीचा धोकादायक नविन विषाणू आढळून आल्याने खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार विश्वस्त मंडळाने संत मुक्ताबाई मंदिर कोथळी-मुक्ताईनगर शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सफला एकादशीला कुणीही वारीवर येऊ नये. घरूनच मानसिक पुजन चिंतन करावे. तसेच दुकानदांनी वारी बंद असल्याने प्रसाद, फराळ, ईतर दुकाने लावू नये, अशा आशयाचे निवेदन श्रीसंत मुक्ताबाई संस्थान कोथळी मुक्ताईनगर यांनी प्रसिद्ध केले आहे.
कोरोना विषाणुचा नविन स्ट्रेनचा फैलाव जास्त धोकादायक असल्याने एकादशी वारी रद्द करण्यात आली आहे. भाविक, दुकानदारांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे. नियमांचा भंग केल्यास महामारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
– सुरेश शिंदे
पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन