तौत्के चक्रीवादळामुळे(Tauktae Cyclone ) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कालपासून कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उद्या कोकणच्या दौऱ्यावर असणार आहे. मात्र विरोधी पक्षनेत्याने कुठलाही वेळ न घालवता नुकसानग्रस्त भागाला भेटी देण्यास सुरूवातही केली आणि मुख्यमंत्री उशिरा जात असल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. आणि याच मुद्द्यावरुन भाजपचे नेते निलेश राणे(Nilesh Rane)यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.
देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का? असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता आतुर आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ‘कोकणात सलग दुसऱ्या वर्षी मोठं नुकसान झालं आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा दौरा आहे. कोकणाचं मोठं नुकसान झालंय, मात्र गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळालेली नाही. निसर्ग चक्रीवादळावेळी जाहीर झालेली मदत अद्याप मिळालेली नाही. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हे नेहमीचं झालंय’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 20, 2021