उडीद, सोयाबीनच्या दरात घसरण होण्याची शक्यता

0
14

लातूर, वृत्तसंस्था । लातूर जिल्ह्यातील लातूर आणि उदगीर बाजार समितीमध्ये मराठवाड्यातील अनेक भागातून तसेच कर्नाटक,आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतूनही शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. उदगीर आणि लातूर मार्केट यार्डात खरिपातील नवीन मुगापाठोपाठ उडदाची आवक सुरू झाली आहे. यामुळे बाजारात उत्साह संचारला असून शेतमालाला आधारभूत किमतीपेक्षा अधिकची रक्कम मिळत आहे.

मागील पाच ते सहा दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. पावसामुळे शेतमालाला डाग पडल्याने भावात फरक पडला आहे, असं असून ही सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव आता उडदाला मिळत आहे. तो भाव आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि लातूर मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजारपेठेत महाराष्ट्र कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून मोठ्या प्रमाणात मालाची आवक होत असते.

उडीद सारख्या पिकाची आवक जिल्ह्यापेक्षा कितीतरी जास्त कर्नाटक आणि नांदेड जिल्ह्यातून तसेच तेलंगणा राज्यातून होत असते. केंद्र शासनाने उडदाचा सहा हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बाजारात त्यापेक्षा कितीतरी अधिक दर मिळत आहे. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता सध्या तरी धूसर आहे. या वर्षी जून महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती.

उडदाचा पेरा जिल्ह्यामध्ये चांगला झाला होता मात्र मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने कारणाने उडदाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला होता. लातूर जिल्ह्यातील उडदाची आवक जरी कमी असली तरी नांदेड कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणामध्ये उडीद लातूर बाजारपेठ तसेच उदगीर बाजारपेठेमध्ये दाखल होत आहे. मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे ओलावा आणि डाग लागल्याने चांगल्या शेतमालाचे तुलनेत सर्वसाधारण उडदाला कमी दर मिळत आहे.

उडदामध्ये किमान बारा टक्के ओलावा असावा मात्र सध्या 20 ते 25 टक्के ओलावा असल्याने शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. आजच्या पेक्षा दुप्पट ते तिप्पट आवक होईल एकूण बाजाराची स्थिती पाहता उडदाच्या दरावर कोणताही मोठा परिणाम होणार नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here